Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा French Open : फेडररचा तिसऱ्या फेरीत प्रवेश; सामन्यादरम्यान घातली पंचांशी हुज्जत

French Open : फेडररचा तिसऱ्या फेरीत प्रवेश; सामन्यादरम्यान घातली पंचांशी हुज्जत

दुसऱ्या फेरीच्या सामन्यात फेडररने क्रोएशियाच्या मरीन चिलीचवर मात केली.

Related Story

- Advertisement -

स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या फेरीच्या सामन्यात त्याने क्रोएशियाच्या मरीन चिलीचवर ६-२, २-६, ७-६ (७-४), ६-२ अशी मात केली. हा फेडररचा चिलीचवर ११ सामन्यांत दहावा विजय ठरला. परंतु, या सामन्यादरम्यान आपल्या संयमी खेळासाठी ओळखला जाणारा फेडरर पंच इमॅन्युएल जोसेफ यांच्याशी हुज्जत घालताना दिसला. दुसऱ्या सेटमध्ये फेडरर १-३ असा पिछाडीवर होता. त्यावेळी त्याने सामना सुरु करण्याआधी थोडा अधिक वेळ घेतला. त्यामुळे त्याने वेळेचे उल्लंघन केल्याचे म्हणत पंचांनी त्याला ताकीद दिली. ही गोष्ट फेडररला फारशी न आवडल्याने त्याने पंचांशी हुज्जत घातली.

चिलीचची अपयशी झुंज

पंचांसोबत झालेल्या वादानंतरही फेडररने आपला चांगला खेळ सुरु ठेवत हा सामना जिंकला. या सामन्याचा पहिला सेट फेडररने ६-२ असा सहजपणे जिंकला. परंतु, दुसऱ्या सेटमध्ये चिलीचने दमदार पुनरागमन करत ६-२ अशी बाजी मारली. तसेच तिसऱ्या सेटमध्येही त्याने चांगली झुंज दिली. मात्र, फेडररने टाय-ब्रेकरमध्ये आपला खेळ उंचावला आणि हा टाय-ब्रेकर ७-४ असा जिंकला. तसेच त्याने चौथा सेटही ६-२ असा जिंकत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

डॅनिल मेदवेदेव्हची आगेकूच 

- Advertisement -

दुसऱ्या सीडेड रशियाच्या डॅनिल मेदवेदेव्हनेही तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीतील दुसऱ्या फेरीच्या सामन्यात त्याने अमेरिकेच्या टॉमी पॉलचा ३-६, ६-१, ६-४, ६-३ असा पराभव केला. तिसऱ्या फेरीत मेदवेदेव्हचा अमेरिकेच्या रायली ओपेल्काशी सामना होईल. तसेच नवव्या सीडेड माटेयो बेरेटिनीने दुसऱ्या फेरीत अर्जेंटिनाच्या फेडरिको कोरियावर ६-३, ६-३, ६-२ अशी मात करत आगेकूच केली.

- Advertisement -