घरक्रीडागांगुलीने उचलून घेतले तो क्षण अविस्मरणीय !

गांगुलीने उचलून घेतले तो क्षण अविस्मरणीय !

Subscribe

- रिषभ पंत

दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार्‍या रिषभ पंतने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात नाबाद ७८ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे दिल्लीने यंदाच्या मोसमातील आपला सातवा सामना जिंकला. त्यामुळे ते गुणतक्त्यात पहिल्या स्थानी पोहोचले आहेत. या सामन्यात राजस्थानने दिलेल्या १९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला ३० चेंडूत ५० धावांची गरज होती. पंतने एकट्यानेच यापैकी ३५ धावा केल्या. त्याने अखेरच्या षटकात षटकार लगावत दिल्लीला हा सामना जिंकवून दिला. त्याने हा षटकार मारताच दिल्ली कॅपिटल्सचा सल्लागार आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने त्याला उचलून घेतले. हा क्षण मी कधीही विसरणार नाही, असे सामन्यानंतर पंत त्याचा दिल्ली संघातील सहकारी पृथ्वी शॉसोबत बोलताना म्हणाला.

मी जेव्हा षटकार मारून सामना संपवला, तेव्हा संघातील प्रत्येक जण माझे अभिनंदन करत होता. खासकरून सौरव (गांगुली) सरांनी जेव्हा मला उचलून घेतले, तो क्षण माझ्यासाठी खूपच खास होता. यासारखा अनुभव मला याआधी आलेला नाही. मी तो क्षण कधीही विसरणार नाही. आम्ही संघ म्हणून अशा मोठ्या सामन्यांत अखेरच्या षटकांत चांगली कामगिरी करून सामना जिंकण्याबाबत चर्चा करत होतो आणि जेव्हा तुम्ही खरंच सामना जिंकता, त्यावेळची भावना खूप खास असते, असे पंत म्हणाला.

- Advertisement -

इंग्लंडमध्ये मे महिन्यापासून सुरु होणार्‍या विश्वचषकासाठी पंतची भारतीय संघात निवड झालेली नाही. राजस्थानविरुद्धच्या खेळीदरम्यान मी याचा विचार करत होतो, असे पंतने सांगितले. तुम्ही जेव्हा संघाला सामना जिंकवून देता, त्यावेळची भावना वेगळी, खूप खास असते. मी खोटं बोलणार नाही, या खेळीदरम्यान माझी विश्वचषकासाठी निवड झालेली नाही, याचा मी विचार करत होतो, असे सामन्यानंतर पंत म्हणाला. विश्वचषकासाठी निवड समितीने पंतऐवजी अनुभवी दिनेश कार्तिकला पसंती दिली आहे.

रिषभ हा मॅचविनर खेळाडू – गांगुली

- Advertisement -

राजस्थानविरुद्धच्या सामन्यानंतर सौरव गांगुलीने रिषभ पंतचे कौतुक केले. गांगुली म्हणाला, रिषभसारखे खेळाडू हे मॅचविनर असतात. तुम्ही अशा खेळाडूंना तुमचा खेळ बदला असे सांगू शकत नाही. त्याच्यासारखे खेळाडू ४-५ सामन्यांत निराशाजनक कामगिरी करतील. मात्र, त्यांचा दिवस असल्यास ते तुम्हाला एकहाती सामना जिंकवून देऊ शकतात. त्यामुळेच असे खेळाडू संघात असणे महत्त्वाचे असते.

भारताने चूक केली – पॉन्टिंग

भारताने रिषभ पंतची विश्वचषकासाठी निवड केली नाही, हे त्यांचे चुकले, असे विधान दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने केले आहे. विश्वचषकासाठी निवड न झाल्यामुळे रिषभ किती निराश होता हे मला माहित आहे. माझ्या मते, भारताने त्याला या संघात न घेऊन चूक केली आहे. मला वाटते की इंग्लंडच्या वातावरणात मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंच्याविरुद्ध त्याने चांगली फटकेबाजी केली असती, असे पॉन्टिंग म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -