विराट कोहलीच्या विकेटवर गावसकरांनी उपस्थित केला प्रश्न

मुंबई : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाने 10 विकेट राखून पराभव केला. भारताने दिलेले 118 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने अवघ्या 11 षटकांत पूर्ण केले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजी आणि गोलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. विराट कोहली 31 धावा वगळता अक्षर पटेलने २९ धावांचे योगदान दिले. मात्र विराट कोहलीने मैदानावर वेळ घालवूनसुद्धा नॅथन एलिसच्या सरळ चेंडूला स्वीप मारण्याच्या प्रयत्नात पायचीत बाद झाला. तेव्हा कॉमेंट्री करत असलेल्या सुनील गावस्कर यांनी कोहली आऊट होण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, कोहली वारंवार अशा चुका करत आहे.

स्टार स्पोर्ट्सवरील एका कार्यक्रमात कोहलीच्या विकेटबद्दल बोलताना गावसकर म्हणाले की, ‘तो पुन्हा एकदा सरळ चेंडूला चुकीच्या पद्धतीने बाद झाला आहे. तो गेल्या काही दिवसांपासून फॉर्ममध्ये येत आहे. पण तो सतत वारंवार सरळ चेंडूला विरुद्ध दिशेने खेळत आहे. तो सतत स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करताना आपली विकेट गमावत आहे. तो सरळ चेंडू मिड-ऑनच्या दिशेने खेळत नसल्यामुळे सतत अडचणीत येत आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात मिचेल स्टार्कच्या चेंडूवरही कोहली सरळ चेंडू विरुद्ध दिशेने खेळण्याच्या प्रयत्नात पायचीत बाद झाला होता. अशा स्थितीत कोहलीची चूक पकडत गावस्कर यांनी आपले मत मांडले आहे.

दुसऱ्या सामन्याबद्दस बोलायचे तर मिचेल स्टार्कने आश्चर्यकारक गोलंदाजी केली आणि 5 विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्टार्कने आतापर्यंत 9 वेळा 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. उत्कृष्ट कामगिरीसाठी स्टार्कला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.

एकदिवसीय मालिका न गमावण्याची भारताला संधी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 22 मार्च रोजी चेन्नई येथे होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करो किंवा मरो असा आहे. जो संघ तिसरा सामना जिंकेल त्याच्याकडे ट्रॉफी असेल. भारताने दीर्घकाळापासून एकही एकदिवसीय मालिका गमावलेली नाही. त्यामुळे भारतीय संघाला हा विक्रम कायम राखण्याची संधी आहे. दुसरीकडे, कसोटी मालिकेतील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय मालिका जिंकण्याची संधी आहे.