धोनी बनण्याचा प्रयत्न करू नकोस!

गिलक्रिस्टचा रिषभ पंतला सल्ला

युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतकडे भारतीय क्रिकेट संघाचे भविष्य म्हणून पाहिले जाते. त्याला सातत्याने संधी देता यावी यासाठी अनुभवी महेंद्रसिंग धोनीला इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी विश्वचषकानंतर संघातून वगळण्यात आले आहे. पंतने सुरुवातीला कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती.

मात्र, त्याला एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये फारसे यश मिळाले नाही. त्यातच आता त्याने कसोटी संघातीलही आपले स्थान गमावले आहे. नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सामन्यात त्याने डीआरएसबाबत निर्णय घेतानाही काही चुका केल्या. त्यामुळे त्याच्यावर टीका झाली. धोनी हा त्याच्या डीआरएसच्या योग्य वापरासाठी ओळखला जातो. मात्र, भारतीय चाहत्यांनी धोनी आणि पंतमध्ये तुलना करणे थांबवले पाहिजे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अ‍ॅडम गिलक्रिस्टला वाटते.

मला दोन खेळाडूंमध्ये तुलना केलेली आवडत नाही. भारतीय चाहत्यांनी धोनी आणि पंतमध्ये तुलना करणे थांबवले पाहिजे. धोनीने फारच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भविष्यात एखादा खेळाडू त्याच्याइतकीच चांगली कामगिरी करू शकेल, पण याची शक्यता फार कमी आहे. रिषभ हा प्रतिभावान युवा खेळाडू आहे. आता त्याने कारकिर्दीला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याच्याकडून धोनीसारख्या कामगिरीची अपेक्षा योग्य नाही. त्याच्यावर दबाव टाकता कामा नये, असे गिलक्रिस्ट म्हणाला.

तसेच तू पंतला काय सल्ला देशील असे विचारले असता गिलक्रिस्टने सांगितले, मी रिषभ पंतला इतकेच सांगीन की धोनीकडून जितके शक्य तितके शिक. मात्र, धोनी बनण्याचा प्रयत्न करू नकोस. फक्त सर्वोत्तम रिषभ पंत बनण्याचा प्रयत्न कर.

सध्या एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमुळे चाहते कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवत आहेत. मात्र, खेळाडू अजूनही कसोटी क्रिकेटला सर्वाधिक महत्त्व देतील अशी गिलक्रिस्टला आशा आहे. आताच्या काळात, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटच्या युगात चाहते पाच दिवस चालणारे कसोटी सामने फारसे पाहत नाहीत. मात्र, मला आशा आहे की खेळाडू अजूनही कसोटी क्रिकेटलाच सर्वाधिक महत्त्व देतील, असे गिलक्रिस्ट म्हणाला.

भारत ऑस्ट्रेलियातही डे-नाईट सामना खेळेल!

भारतीय संघ २२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत बांगलादेशविरुद्ध आपला पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळणार आहे. भारतीय संघ पुढच्या वेळी जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर येईल, तेव्हा डे-नाईट कसोटी सामना खेळेल असा गिलक्रिस्टला विश्वास आहे. भारतीय संघ पुढील ऑस्ट्रेलिया दौर्‍यात डे-नाईट कसोटी सामना खेळेल असे मला वाटते. मला आधी हे कसोटी सामने यशस्वी होतील याची खात्री नव्हती. मात्र, डे-नाईट सामन्यांचा कसोटी क्रिकेटवर सकारात्मक परिणाम होत आहे, असे गिलक्रिस्टने सांगितले.