घरक्रीडाIND vs AUS : स्टिव्ह स्मिथचे शतक; पण टीम इंडियाचे दमदार कमबॅक  

IND vs AUS : स्टिव्ह स्मिथचे शतक; पण टीम इंडियाचे दमदार कमबॅक  

Subscribe

दुसऱ्या दिवसअखेर भारताची २ बाद ९६ अशी धावसंख्या होती. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीचा दुसरा दिवस भारताचा डावखुरा फिरकीपटू रविंद्र जाडेजा आणि युवा सलामीवीर शुभमन गिलने गाजवला. स्टिव्ह स्मिथने शतक झळकावले, पण त्याला मार्नस लबूशेन वगळता इतरांची साथ लाभली नाही. जाडेजाने ६२ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३३८ धावांवर आटोपला. याचे उत्तर देताना दुसऱ्या दिवसअखेर भारताची २ बाद ९६ अशी धावसंख्या होती.

भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकला होता. त्यामुळे तो सिडनी कसोटीत पुनरागमन करताना कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष होते. रोहित आणि गिलने २७ षटके खेळून काढत ७० धावांची सलामी दिली. रोहितने ७७ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २६ धावांची खेळी केल्यावर त्याला जॉश हेझलवूडने माघारी पाठवले. गिलने मात्र चांगली फलंदाजी सुरु ठेवत १०० चेंडूत कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. मात्र, पुढच्याच चेंडूवर पॅट कमिन्सने त्याला कॅमरुन ग्रीनकरवी झेलबाद केले. गिलच्या ५० धावांच्या खेळीत ८ चौकारांचा समावेश होता. यानंतर चेतेश्वर पुजारा (५३ चेंडूत नाबाद ९) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (४० चेंडूत नाबाद ५) यांनी सावधपणे फलंदाजी केली.

- Advertisement -

त्याआधी दुसऱ्या दिवशी २ बाद १६६ धावांवरून पुढे खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३३८ धावांत गारद झाला. पहिल्या दिवसअखेर ६७ धावांवर नाबाद असणारा लबूशेन शतक करणार असे वाटत असतानाच त्याला ९१ धावांवर जाडेजाने बाद केले. जाडेजाने मॅथ्यू वेड (१३), पॅट कमिन्स (०) आणि नेथन लायन (०) यांनाही फार काळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. तर जसप्रीत बुमराहने कॅमरुन ग्रीन (०) आणि कर्णधार टीम पेनचा (१) अडथळा दूर केला. एका बाजूने विकेट जात असताना स्मिथने मात्र अप्रतिम फलंदाजी सुरु ठेवत २०१ चेंडूत शतक पूर्ण केले. अखेर जाडेजाने त्याला धावचीत केल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव ३३८ धावांवर आटोपला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -