इस्लामाबाद : टीम इंडियाचा एकदिवसीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिलने पाकिस्तानविरुद्ध 46 धावांची चांगली खेळी केली; पण त्याचे अर्धशतक हुकले. पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अबरार अहमदच्या एका अप्रतिम बॉलवर शुभमन गिल चकला आणि क्लीन बोल्ड झाला. शुभमन चकीत होऊन पाहतच राहिला. पण त्यानंतर अबरारने गिलकडे पाहून जे हावभाव केले, त्याबद्दल सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. खुद्द पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने याबद्दल नाराजी व्यक्त करत अबरारला कानपिचक्या दिल्या. (Gill Vs. Abrar : Wasim Akram angry with Abrar)
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगला. पाकिस्तानच्या संघाने भारतीय संघासमोर 242 धावांचे आव्हान ठेवले होते. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिलने दमदार सुरुवात केली. पण शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीसमोर कर्णधार रोहित शर्मा पुन्हा फेल ठरला. 15 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकारासह 20 धावा करत तो बाद झाला. अर्धशतकासाठी 4 धावा बाकी असताना गिल बाद झाला. भारताच्या डावाच्या 17व्या षटकात अबरार अहमदने गिलला बाद केले. त्याने टाकलेल्या चेंडूचा टप्पा लेग-स्टंप लाइनवर पडला आणि गिलला चकवा देत ऑफ-स्टंपच्या वरच्या बाजूला लागला. अबरार अहमद हा एकमेव पाकिस्तानी गोलंदाज होता जो भारताविरुद्ध चांगली गोलंदाजी करताना दिसला. अबरारने 10 षटकांत 28 धावा देऊन एक विकेट घेतली.
शुभमन गिलला बाद केल्यानंतर अबरार अहमदने हाताची घडी घालून मान हलवून गिलला मैदानाबाहेर जाण्याची खूण केली. गिलने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी, अबरारचे ते हावभाव अनावश्यक होते, असे अनेक क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अबरारच्या त्या चेंडूने मी खूप प्रभावित झालो होतो, पण त्याने ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केले ते योग्य नव्हते. अबरारला दम देत, तू काय करत आहेस, हे विचारणारा कोणी नाही का? असा प्रश्न त्याने केला.
प्रत्येक गोष्टीचा एक काळ-वेळ असतो ना! सामन्यात त्यावेळची परिस्थिती पाहा…, तुम्ही दबावाखाली आहात, मात्र तरीही तुम्ही पाच विकेट घेतल्यासारखे सेलिब्रेशन करता! जिंकत असाल तर, तुम्ही सेलिब्रेशन करणे ठीक आहे. विकेट मिळाल्यावर तुम्ही विनम्र असले पाहिजे. त्यांना हे सांगणारे कोणी नाही. टीव्हीवर सुद्धा हे चांगले दिसले नाही, अशा कानपिचक्या त्याने दिल्या आहेत.
हेही वाचा – Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी थेट ट्रम्प यांनाच म्हटले थँक यू, पण का? वाचा –