चेंडू चमकवण्यासाठी कृत्रिम पदार्थ द्या!

पॅट कमिन्सचे उद्गार

करोनाच्या भीतीमुळे क्रिकेटमध्ये चेंडू चमकवण्यासाठी थुंकी किंवा घामाच्या वापरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) बंदी घालण्याची शक्यता आहे. मात्र, तसे झाल्यास गोलंदाजांचे काम खूप अवघड होईल आणि क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ बनेल अशी भीती अनेकांना वाटत आहे. त्यामुळे बॅट आणि चेंडू यांच्यात समतोल राखायचा असल्यास आयसीसीने चेंडूला तकाकी आणण्यासाठी कृत्रिम पदार्थ वापरण्याला परवानगी दिली पाहिजे, असे मत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने व्यक्त केले.

चेंडू चमकवण्यासाठी थुंकीच्या वापरावर बंद घातली, तर आम्हाला दुसरा काही तरी पर्याय असला पाहिजे. घामामुळे चेंडूला तकाकी येते; पण आम्हाला आणखीही पर्याय हवे आहेत. आता हा पर्याय मेण किंवा आणखी काही असेल हे मी सांगू शकत नाही. चेंडू चमकवण्यासाठी थुंकीचा वापर करणे सुरक्षित नाही, असे विज्ञान सांगत असल्यास आपल्याला ते ऐकावेच लागेल. मात्र, थुंकीला पर्याय असलाच पाहिजे. अन्यथा क्रिकेटमधील मजा कमी होईल, असे कमिन्सने नमूद केले. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील क्रिकेट बॉल बनवणारी कंपनी असलेल्या कुकाबुराने मेण तयार केले होते. या मेणामुळे चेंडूला तकाकी येते आणि तो स्विंग होण्यास मदत होते असे त्यांचे म्हणणे होते.