स्मिथला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला असता!

akthar
-शोएब अख्तर

ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याचे खेळण्याचे तंत्र वेगळे असले तरी स्मिथला रोखणे गोलंदाजांना अवघड जाते. यंदाच्या अ‍ॅशेस मालिकेच्या ४ सामन्यांत त्याने ११०.५७ च्या सरासरीने ७७४ धावा चोपून काढल्या होत्या. नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या दुसर्‍या टी-२० सामन्यात त्याने ५१ चेंडूत ८० धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. स्मिथच्या या सातत्यपूर्ण कामगिरीने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर खूप प्रभावित झाला आहे. तसेच त्याला रोखण्यासाठी मी त्याला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला असता, असे अख्तर म्हणाला.

स्मिथच्या कामगिरीचे मला आश्चर्य वाटते. त्याचे तंत्र आणि खेळण्याची पद्धत विचित्र आहे, पण तो खूप धाडसी आहे. त्यामुळेच त्याला यश मिळत आहे. तो चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचतो आणि त्याने मोहम्मद आमिरला चोप दिला. तो ही कामगिरी कशी करतो हे मला ठाऊक नाही. तो जर माझ्या काळात खेळत असता, तर मी अधिक उसळी घेणारे चेंडू टाकत त्याला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला असता. मात्र, तो सध्या ज्याप्रकारे फलंदाजी करत आहे, ते पाहता त्याला जायबंदी करणे अवघड आहे. तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे, असे अख्तरने सांगितले.

तसेच अख्तर पुढे म्हणाला, स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यापासून खोर्‍याने धावा केल्या आहेत. स्मिथ टी-२० क्रिकेटमध्ये यशस्वी होऊ शकत नाही असे काही लोकांचे म्हणणे आहे. मात्र, तो आपल्या कामगिरीने त्यांना चुकीचे ठरवत आहे.