घरक्रीडाIND vs AUS 'A' : पंत, विहारीची शतके; भारतीय संघाला ४७२ धावांची आघाडी

IND vs AUS ‘A’ : पंत, विहारीची शतके; भारतीय संघाला ४७२ धावांची आघाडी

Subscribe

दुसऱ्या दिवसअखेर भारताची ४ बाद ३८६ अशी धावसंख्या होती.

रिषभ पंत आणि हनुमा विहारी यांनी ऑस्ट्रेलिया ‘अ’विरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्याच्या दुसऱ्या डावात दमदार शतके झळकावली. त्यामुळे दुसऱ्या दिवसअखेर भारताची ४ बाद ३८६ अशी धावसंख्या होती आणि त्यांच्याकडे ४७२ धावांची आघाडी होती. पंतला शतक पूर्ण करण्यासाठी दिवसाच्या अखेरच्या षटकात १९ धावांची आवश्यकता होती. त्याने जॅक विल्डरमथच्या या षटकात चार चौकार आणि एक षटकार मारत ७३ चेंडूतच शतक झळकावले. दिवसअखेर तो १०३ धावांवर नाबाद होता. त्याच्या या खेळीत नऊ चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता.

सिडनी येथे प्रकाशझोतात (डे-नाईट) होत असलेल्या या सामन्याच्या पहिल्या डावात भारताच्या फलंदाजांना चांगला खेळ करण्यात अपयश आले होते. त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष होते. मयांक अगरवाल सध्या कसोटी संघाचा प्रमुख सलामीवीर आहे. त्याने दुसऱ्या डावात ६१ धावांची खेळी करत चांगल्या फॉर्मात असल्याचे दाखवून दिले. त्याचा सलामीचा साथीदार म्हणून पृथ्वी शॉ, शुभमन गिल आणि लोकेश राहुल यांच्यात स्पर्धा आहे.

- Advertisement -

राहुल या सराव सामन्यात खेळला नाही. पहिल्या डावात पृथ्वीने ४० आणि गिलने ४३ धावांची खेळी केली होती. दुसऱ्या डावात पृथ्वी केवळ ३ धावा करून बाद झाला. गिलने मात्र आक्रमक शैलीत फलंदाजी करत ७८ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे ३८ धावा करून माघारी परतला. यानंतर विहारी आणि पंत यांनी अप्रतिम फलंदाजी करत १४७ धावांची अभेद्य भागीदारी रचली. विहारीने १९४ चेंडूत नाबाद १०४ धावांची खेळी करत पहिल्या कसोटीसाठी आपले संघातील स्थान जवळपास पक्के केले आहे.


संक्षिप्त धावफलक – भारत : १९४ आणि ४ बाद ३८६ (विहारी नाबाद १०४, पंत नाबाद १०३, गिल ६५, मयांक ६१; स्टेकेटी २/५४) विरुद्ध ऑस्ट्रेलिया ‘अ’ : पहिला डाव १०८. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -