घरक्रीडापाचव्या टेस्टसाठी विहारी, जडेजाला संधी मिळण्याची शक्यता

पाचव्या टेस्टसाठी विहारी, जडेजाला संधी मिळण्याची शक्यता

Subscribe

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ४ सामन्यांत गमावल्यानंतर आता पाचव्या सामन्यात भारतीय संघात काही बदलांची शक्यता आहे. शुक्रवारपासून ओव्हल मैदानावर सुरुवात होणाऱ्या या सामन्यात हनुमा विहारी आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाला संधी मिळण्याची शक्यता आहे.

इंग्लंडविरुद्ध साऊथहॅम्पटन येथे झालेल्या चौथ्या कसोटीत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. हा सामना भारताने ६० धावांनी गमावला. त्यामुळे भारताने इंग्लंडविरुद्धची मालिकाही ३-१ अशी गमावली. या चौथ्या कसोटीत विराट कोहली कर्णधार झाल्यापासून पहिल्यांदाच भारतीय संघाने एकही बदल केला नव्हता. पण आता ही मालिका गमावल्यामुळे भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे.

पांड्याच्या जागी विहारी 

पाचव्या कसोटी सामन्यात भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या जागी हनुमा विहारीला पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्याने या मालिकेतील तिसरी कसोटी सोडता इतर सामन्यात चांगले प्रदर्शन केले नाही. त्यामुळे त्याच्याजागी हनुमा विहिरीला संधी मिळण्याची शक्यता आहे. विहिरीने गेल्या काही काळात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये त्याची सरासरी जवळपास ६० ची आहे. त्यामुळे त्याला संधी मिळाल्यास त्याच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे.
सौजन्य – Scroll.in

जडेजाही येणार संघात 

ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनच्या जागी डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा संघात येऊ शकेल. जडेजाला या मालिकेत अजून संधी मिळालेली नाही. तर द.आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही त्याला संधी मिळाली नव्हती. त्यामुळे जर त्याला संधी मिळाली तर खूप काळानंतर पहिल्यांदाच परदेशात तो खेळेल. अश्विन साऊथहॅम्पटन येथे झालेल्या चौथ्या कसोटीत फिरकीला पोषक परिस्थितीतही अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याचे संघातील स्थान जाण्याची शक्यता आहे.

पृथ्वीला इतक्यात संधी नाही 

मुंबईकर सलामीवीर पृथ्वी शॉला पाचव्या सामन्यात लोकेश राहुलच्या जागी संधी मिळेल असा अंदाज होता. पण आता असे होण्याची चिन्हे कमी आहेत. राहुलने या मालिकेच्या ८ डावांत अवघ्या १४ च्या सरासरीने ११३ धावा केल्या आहेत. असे असूनही त्याला आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. तर पृथ्वीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी अजून काही काळ थांबावे लागणार आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -