घरक्रीडाभारतीय क्रिकेटचा दादा आणि त्याची दादागिरी

भारतीय क्रिकेटचा दादा आणि त्याची दादागिरी

Subscribe

आज दादा अर्थातच सौरव गांगुलीचा वाढदिवस..

आठवतोय का २००२चा लॉर्डस वरचा सामना.. हो हो तोच.. दादाने लॉर्डसच्या बाल्कनीमध्ये उभं राहून शर्ट हवेत भिरकावला होता, पण तो भिरकावण्यापूर्वी त्याच वर्षी अगदी पाच महिन्यांपूर्वी आपल्या मुंबईमध्ये ते पण वानखेडेवर फ्लिन्टॉफने सामना जिंकल्यावर शर्ट भिरकावला होता. मग शांत राहील तो दादा कसला.. चला इंग्लंड मध्ये दाखवू यांना असं ठरवलं आणि लॉर्डसवर शर्ट भिरकावलाच..

असा हा प्रिन्स ऑफ कोलकाता, दादा, महाराजा अशा अनेक बिरुदावली मिरवणारा सौरव गांगुली याचा आज वाढदिवस… त्याला खुप साऱ्या शुभेच्छा..

- Advertisement -

गांगुलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरुवात वादातच झाली होती. १९९२ मध्ये त्याला संघात स्थान दिले पण जास्त रागीट असल्याचा ठपका ठेवत त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर ठेवण्यात आले. त्यानंतर सहा वर्षांनी दादाला भारतीय संघात इंग्लंड विरुद्ध मालिकेसाठी परत स्थान मिळाले त्यात याने १३१ धावा करत आपले संघातील स्थान निश्चित केले. पुढे झालेल्या ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि पाकिस्तान विरुद्धच्या मालिकांमध्ये त्याचे प्रदर्शन चांगले राहिले त्यामुळे आता संघात असलेल्या त्याच्या स्थानाला धक्का लागण्याचा प्रश्न नव्हता. सन २००० मध्ये जेव्हा सचिनने कर्णधारपद सोडले तेव्हा गांगुलीशिवाय दुसरा पर्याय नव्हताच.

कर्णधारपदाची धुरा सांभाळताना संयम असावा लागतो, शांत रहावं लागतं असल्या ज्या काही ठरवल्या गेलेल्या गोष्टी होत्या त्या त्याने ‘ऑन माय फुट’ करत बाजूला केल्या. इथेच त्याने दादागिरी जन्माला घातली. खरं तर त्यानेच भारताला समोरच्या संघाच्या डोळ्यात डोळे घालून सामना खेळायला शिकवलं..

- Advertisement -

ज्या काळात ऑस्ट्रेलिया संघ सर्व क्रिकेट जगावर अधिराज्य गाजवत होता त्यावेळी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून २००३च्या विश्वचषकात भारत त्यांना अंतिम सामन्यात जाऊन भिडला. तिथे भारत हरला पण आफ्रिकेतून येताना कमालीचा आत्मविश्वास घेऊन आला. त्यावेळी त्याने सर्व भारतीयांना एका गोष्टीची नक्की जाणीव करून दिली कि आपणही विश्वचषक जिंकू शकतो. २०११चा विश्वचषक जिंकण्यात भारतीय संघाचा हा आत्मविश्वास नक्की कामी आला असेल यात शंकाच नाही.

गांगुली हा सचिन नंतर १० हजार धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. टेस्ट क्रिकेटमध्ये गांगुलीच्या नेतृत्वाखाली ४९ सामन्यात भारतीय संघाने २१ वेळा विजय मिळवला आहे. या काळात गांगुलीने झहीर खान, इरफान पठाण, मोहम्मद कैफ, युवराज सिंग, हरभजन सिंग, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि महेंद्रसिंग धोनी असे खेळाडू तयार केले.

२००४ मध्ये धोनीला बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान मिळाले. त्यावेळी तो क्रमांक सातवर बॅटिंग करायला यायचा. या मालिकेत धोनीला चांगले प्रदर्शन करता आले नाही. तीन सामन्यांमध्ये त्याच्या फक्त १२ धावा होत्या त्यापैकी अगदी पहिल्या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. त्यानंतर धोनीला भीती वाटत होती कि संघात जागा मिळेल कि नाही. मात्र विशाखापट्टणम येथे होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सौरव गांगुलीने ड्रेसिंगरूम मध्ये धोनीला आवाज दिला. तेव्हा धोनी सातव्या नंबरवर खेळणार असल्याने नॉर्मल होऊन बसला होता, त्यावेळी त्याच्याजवळ जाऊन गांगुलीने धोनीला सांगितले, आज तूम तीनपे खेलोगे, धोनी आश्चर्य करके बोले और दादा आप? में चार पे खेलुंगा. त्या सामन्यात धोनीने पाकिस्तानविरुद्ध १४८ धावा अक्षरशः कुटल्या. या शतकानंतर धोनीचे संघात स्थान पक्के झालेच होते. याबाबत धोनी म्हणतो कि, “तो सामना माझ्यासाठी करा किंवा मरा असा होता, दादाने माझ्यावर विश्वास ठेवून मला क्रमांक तीनला खेळायला पाठवले.” त्यानंतर खऱ्या अर्थाने धोनी बहरायला लागला, एवढा बहरला कि गांगुलीने २००८ मध्ये शेवटचा सामना धोनीच्या नेतृत्वाखाली खेळला. त्या सामन्यात शेवटच्या काही ओव्हर धोनीने कर्णधारपदाची धुरा गांगुलीकडे दिली होती.

फ्लिन्टॉफने वानखेडेवर शर्ट भिरकावला त्या सामन्यात गांगुलीने २ बळी घेऊन स्वतः ८० धावा केल्या होत्या. भारत तो सामना ६ धावांनी हरला होता पण पुढच्या पाच महिन्यात भारत इंग्लंडमध्ये नेटवेस्टसाठी गेला होता. या अंतिम सामन्यात नसीर हुसेनच्या संघाने सव्वातीनशे धावांचं लक्ष्य समोर ठेवलं होतं. या सामन्यात गांगुली आणि सेहवागने सुरुवात चांगली करून दिली होती पण नंतर काही विकेट्स पडत गेल्या आणि सामना पराभवाच्या छायेत गेल्याचे दिसायला लागले पण त्याच वेळी भारताला मोहम्मद कैफ नावाचा मधल्या फळीतला विश्वासू शिलेदार सापडला. त्याने आणि युवराजने चांगली भागीदारी रचत भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला आणि मग एकच जल्लोष.. लॉर्डसच्या बाल्कनीमध्ये दादाने मीच दादा असल्याचे शर्ट भिरकावून दाखवून दिले. आताही एका मुलाखतीमध्ये तो म्हणतोय, “जर विराटने विश्वकप जिंकला तर मी त्याला घेऊन ऑक्सफर्ड स्ट्रीटवर शर्ट काढून फिरेल.”

असा हा दादा, बंगाली टायगर कोणाला कधी घाबरला नाही कोणाच्या टीकेला एकतर उत्तरच दिले नाही किंवा दिले तर पुन्हा त्या टीकाकाराने कधी टीकाच केली नसेल.

दादागिरी जगला तो.. क्रिकेटच्या वातावरणातही आणि बाहेरच्या आयुष्यातही..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -