T20 world cup 2021 : न्यूझीलंड विरूध्दच्या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी खुशखबर ; हा स्टार खेळाडू् फिट

भारतीय संघातील स्टार ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पंड्या फिट झाला आहे

टी २० विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर कमबॅक करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारतीय संघाचा पुढील सामना न्यूझीलंड विरूध्द होणार आहे, ह्या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे.भारतीय संघातील स्टार ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पंड्या फिट झाला आहे आणि आता येणाऱ्या सामन्यात त्याच्याकडून चांगली खेळी करण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या प्लेइंग ११ च्या अनुषंगाने ही एक चांगली बातमी आली आहे.

पाकिस्तान विरूध्दच्या सामन्यात झाली होती दुखापत

लक्षणीय बाब म्हणजे पंड्याला पाकिस्तान विरूध्दच्या सामन्यात फलंदाजी करताना दुखापत झाली होती. दुखापत मोठी असल्याने त्याच्या जागी राखीव खेळाडू ईशान किशनला फिल्डिंग करावी लागली होती. नंतर भारतीय संघाने कोणताही विलंब न करता पंड्याला उपचारासाठी पाठवले. पण समोर आलेल्या माहितीनुसार पंड्याची दुखापत बऱ्यापैकी ठिक झाली आहे तो पहिल्या पेक्षा चांगला ऑलराउंडर म्हणून खेळण्यासाठी तयार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार पंड्याला सध्या कोणताही त्रास होत नाही, तो पहिल्या पेक्षा तंदुरूस्त झाला असून त्याला फक्त खबरदारीचा उपाय म्हणून उपचारासाठी दाखल केले होते. संघ निवड समिती कोणताच धाडसी निर्णय घेण्यास तयार नव्हती कारण रविवारचा सामना हंगामातील फक्त पहिला सामना होता. आता कुठे विश्वचषकाची सुरूवात झाली आहे, आगामी सामन्यासाठी पंड्या फिट होणे संघासाठी आनंदाची बातमी आहे.

पाकिस्तान विरूध्दच्या सामन्यात पंड्याला काही खास खेळी करता आली नाही. पाकिस्तानच्या आक्रमक गोलंदाजीवर विराट कोहली वगळता सर्वच फलंदाज चितपट झाल्याचे पहायला मिळाले. जेव्हा शेवटच्या षटकात भारताला मोठ्या धावांची गरज होती, तेव्हा सर्व भारतीय फॅन्सना पंड्याकडून अपेक्षा होती पण पंड्या ८ चेंडूत फक्त ११ धावा बनवून बाद झाला. पंड्या हारिस रऊफच्या चेंडूवर बाद झाला. त्याचा झेल पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने घेतला होता.