पंतला चुका सुधरवण्यात मदत करतो!

वृद्धिमान साहाचे विधान

भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला मागील काही काळात सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यांत भारताने त्याच्या जागी पुन्हा फिट झालेल्या अनुभवी वृद्धिमान साहाला संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यामुळे आमचे संबंध अजिबातच बिघडले नाहीत, असे साहाने सांगितले.

तू पंतला मार्गदर्शन करत आहेस का, असे विचारले असता साहाने सांगितले, मी त्याला मार्गदर्शन करत आहे असे म्हणता येणार नाही. मात्र, आम्ही दोघे यष्टिरक्षणाबाबत चर्चा करतो. कोणत्या खेळपट्टीवर कशाप्रकारे यष्टिरक्षण केले पाहिजे याबाबतचा निर्णय मी, पंत आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक श्रीधर, असे तिघे मिळून घेतो. आम्ही एकमेकांच्या यष्टिरक्षणाचे निरीक्षण करतो आणि सराव सत्रात खूप मेहनत घेतो. माझे आणि पंतचे खूप चांगले संबंध आहेत. पंत जर काही चुका करत असेल, तर मी त्या सुधरवण्यात त्याला मदत करतो. तसेच मी चुका करत असेन तर पंत ते माझ्यात लक्षात आणून देतो.

साहा हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे, असे कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीआधी म्हणाला होता. मात्र, त्याच्या फलंदाजीत सुधारणा होऊ शकते असे कोहली आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला वाटते. प्रत्येक खेळाडूला संघाच्या यशात योगदान द्यायचे असते. यष्टिरक्षणासोबतच मी फलंदाजीत योगदान देण्याचा आणि इतर फलंदाजांबरोबर चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न करतो. कधी माझ्या धावा होतात, तर कधी होत नाहीत, असे साहा म्हणाला.