IPL 2020 : स्पर्धा सुरु होण्याआधीच जाणून घ्या हे १० अनोखे विक्रम 

आयपीएलच्या तेराव्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात होत आहे.  

chris gayle
क्रिस गेल 

आयपीएल स्पर्धेच्या तेराव्या मोसमाला १९ सप्टेंबर म्हणजेच शनिवारपासून सुरुवात होत आहे. एरवी मार्च-एप्रिलमध्ये सुरु होणारी ही स्पर्धा यंदा कोरोनामुळे लांबणीवर पडली. मात्र, इतक्या महिन्यांनी का होईना, ही स्पर्धा सुरु होत असल्याचा चाहत्यांना आनंद आहे. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव अजून कमी झालेला नसल्याने यंदाचे आयपीएल युएईमध्ये होणार आहे. युएईतील दुबई, अबू धाबी आणि शारजाह या तीन शहरांत या स्पर्धेचे सामने खेळले जाणार आहेत. गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यापासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र, ही स्पर्धा सुरु होण्याआधीच या स्पर्धेत काही खेळाडूंनी आणि संघांनी रचलेले विक्रम अविश्वसनीय आहेत. मागील १२ मोसमांत मिळून रचलेल्या अनोख्या विक्रमांवर टाकलेली एक नजर…

१] चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी कर्णधार असून त्याने १७४ पैकी १०४ सामने जिंकले असून त्याने एकूण सामन्यांच्या ५९.८ टक्के सामने जिंकले आहेत.  

२] आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट कोहली अव्वल स्थानी असून त्याने ५४१२ धावा केल्या आहेत. 

३] आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने केली असून त्याच्या नावे ४४ अर्धशतके आहेत.

४] आयपीएलमध्ये एका सामन्यात केलेली सर्वोच्च धावसंख्या क्रिस गेलच्या नावे असून त्याने २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सविरूद्ध नाबाद १७५ धावांची खेळी केली होती.   

५] आयपीएल स्पर्धेत एका डावात केलेली सर्वाधिक धावसंख्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या नावे आहे. २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध आरसीबीने २० षटकांत २६३ धावा केल्या होत्या.

६] आयपीएलमधील एका डावात सर्वात कमी धावाही बंगळुरूच्या संघाने केल्या असून २०१७ मध्ये कोलकाताविरुद्ध त्यांचा डाव अवघ्या ४९ धावांत आटोपला होता.

७] आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज म्हणजे क्रिस गेल. गेलने आयपीएलमध्ये एकूण ६ शतके केली आहेत.

८] आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या नावे आहे. त्याने या स्पर्धेत १७० विकेट घेतल्या आहेत. 

९] आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने गमावण्याचा नकोस विक्रम दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नावे आहे. दिल्लीने एकूण ९७ सामने गमावले आहेत. 

१०] दुसरीकडे आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर असून त्यांनी आतापर्यंत १०८ सामने जिंकले आहेत.