हॉकी इंडियाने केली श्रीजेश, दीपिकाची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

हरमनप्रीत सिंग, वंदना कटारिया आणि नवज्योत कौर यांना अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.

Hockey India Nominates PR Sreejesh, Deepika For Rajiv Gandhi Khel Ratna Award
हॉकीपटू श्रीजेश, दीपिकाची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि महिला हॉकी संघाची माजी खेळाडू दीपिका यांची हॉकी इंडियाने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. या पुरस्कारासाठी १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीतील कामगिरी लक्षात घेतली जाणार आहे. तसेच हरमनप्रीत सिंग, वंदना कटारिया आणि नवज्योत कौर यांना अर्जुन पुरस्कारासाठी, तर माजी खेळाडू आरपी सिंग आणि संगई इबेमहल यांना ध्यान चंद जीवनगौरव पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. प्रशिक्षकांच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी बीजे करिअप्पा आणि सीआर कुमार यांची शिफारस करण्यात आली आहे.

श्रीजेश, दीपिकाची महत्त्वाची भूमिका

मानाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीतील कामगिरी लक्षात घेतली जाणार आहे. या कालावधीत भारतीय पुरुष हॉकी संघाने हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी (२०१८) जिंकली, २०१८ एशियाडमध्ये कांस्यपदक आणि २०१९ एफआयएच मेन्स सिरीज फायनलमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. भारताच्या या तिहेरी यशात श्रीजेशने महत्त्वाची भूमिका बजावली होती. श्रीजेशला याआधी २०१५ मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता, तर २०१७ मध्ये त्याला पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

दुसरीकडे भारतीय महिला हॉकी संघाने २०१८ एशियाडमध्ये आणि २०१८ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रौप्यपदक जिंकले होते. भारताच्या या यशात दीपिकाची मोलाचे योगदान दिले होते. त्यामुळेच तिची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार हे राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणजेच २९ ऑगस्टला दिले जातात.