घरक्रीडारंगतदार सामन्यात हॉलंडची जर्मनीवर मात

रंगतदार सामन्यात हॉलंडची जर्मनीवर मात

Subscribe

 युएफा युरो पात्रता स्पर्धा

जिनी वाईनाल्डमच्या (१ गोल, १ असिस्ट) उत्कृष्ट खेळाच्या जोरावर हॉलंडने युएफा युरो पात्रता स्पर्धेच्या रंगतदार सामन्यात जर्मनीवर ४-२ असा विजय मिळवला. या स्पर्धेतील जर्मनीचा पहिलाच पराभव होता. हॉलंडचा या स्पर्धेतील हा तीन सामन्यांतील दुसरा विजय होता. या दोन्ही संघांचा गट ‘सी’मध्ये समावेश आहे. या गटामध्ये उत्तर आयर्लंड ४ विजयांसह अव्वल स्थानी आहे. उत्तर आयर्लंडने शुक्रवारी झालेल्या सामन्यात लुक्झनबर्गचा १-० असा पराभव केला होता.
हॉलंड आणि जर्मनी या दोन बलाढ्य संघांमधील सामना सुरुवातीपासूनच चुरशीचा झाला. या सामन्याची जर्मनीने आक्रमक सुरुवात केली. याचा फायदा त्यांना नवव्या मिनिटाला मिळाला. सर्ज गनाब्रिने गोल करत जर्मनीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर जर्मनीच्या मार्को रॉइसला गोल करण्याची संधी मिळाली. मात्र, त्याला गोल करण्यात अपयश आले. मध्यंतराला जर्मनीने आपली १-० अशी आघाडी कायम राखली.

मध्यंतरानंतर हॉलंडने आक्रमक सुरुवात केली. मात्र, त्यांना पहिला गोल करण्यासाठी ५९ मिनिटे वाट पाहावी लागली. अखेर रायन बाबेलच्या पासवर फ्रँकी डी याँगने केलेल्या गोलमुळे सामन्यात १-१ अशी बरोबरी झाली. यानंतर ७ मिनिटांनी जॉनाथन ताहने केलेल्या स्वयं गोलमुळे हॉलंडची आघाडी दुप्पट झाली. जर्मनीला ७२ व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली. यावर स्टार खेळाडू टोनी क्रूसने गोल केला आणि सामन्यात २-२ अशी बरोबरी झाली. ६ मिनिटांनंतर हॉलंडला आघाडी घेण्याची संधी मिळाली. या संधीचा डॉनयेल मालेनने योग्य उपयोग केला. त्याने वाईनाल्डमच्या पासवर गोल करत हॉलंडला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. पुढे जर्मनीने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना गोल करण्यात अपयश येत होते. ९० मिनिटांनंतरच्या अतिरिक्त वेळेत वाईनाल्डमने केलेल्या गोलमुळे हॉलंडने हा सामना ४-२ असा जिंकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -