मनोहर यांनी महसूल कपातीचा इशारा देणे कितपत योग्य?

बीसीसीआय सिनियर अधिकार्‍याचा सवाल

भारतात होणार्‍या आयसीसीच्या विविध स्पर्धांवर कर सवलत मिळत नसल्यास बीसीसीआयला देण्यात येणार्‍या महसुलातील हिस्सा कमी करण्यात येईल, असा इशारा आयसीसीने बीसीसीआयला दिला आहे. २०१६ साली झालेल्या टी-२० विश्वचषकावर आयसीसीच्या कर सवलत हवी आहे. सध्या शशांक मनोहर आयसीसीच्या कार्याअध्यक्षपदावर आहेत. ते याआधी बीसीसीआयचे अध्यक्ष होते. त्यामुळे ते बीसीसीआयचे माजी अध्यक्ष असूनही असा इशारा का करत आहेत, असा सवाल बीसीसीआयचे सिनियर अधिकारी उपस्थित करत आहेत.

बीसीसीआय कसे काम करते याबाबतची शशांक यांना चांगली माहिती आहे. २०१६ साली भारतात झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या वेळी ते बीसीसीआयचे अध्यक्ष होते आणि तेच सर्व आर्थिक निर्णय घेत होते. जेव्हा बीसीसीआयला आयसीसीच्या महसुलातील सर्वाधिक भाग मिळत होता, तेव्हा तो कमी करण्यासाठी करार करण्यात आले. याचा भारतावर काय परिणाम होईल याचा त्यांनी विचारही नाही केला. शशांक यांनी विदर्भ क्रिकेट असोसिएशनला विश्वचषकादरम्यान महिला संघाचे सामने आयोजित करण्यासाठी आणि इतर सामन्यांसाठी गरजेपेक्षा जास्त पैसे का दिले? त्यांनी या काळात बीसीसीआयमध्ये सर्वाधिक पदे भूषवली आणि सर्वाधिक आर्थिक निर्णय घेतले. मग असे असताना त्यांनी बीसीसीआयला इशारा देणे योग्य आहे का?, असे बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले.