गोल्डन स्टार क्रिकेट क्लबच्या हृषीकेची तुफानी खेळी: १३ चेंडूत केलं अर्धशतक

पालकमंत्री चषक टिपीएल टी - २० क्रिकेट स्पर्धेत गोल्डन स्टार क्रिकेट क्लबच्या हृषीकेश पवार याने तुफानी खेळी केली आहे. हृषीकेश पवारने १३ चेंडूत पाच चौकार आणि तेवढेच षटकार ठोकत आपलं अर्धशतक पूर्ण केले.

पालकमंत्री चषक टिपीएल टी – २० क्रिकेट स्पर्धेत गोल्डन स्टार क्रिकेट क्लबच्या हृषीकेश पवार याने तुफानी खेळी केली आहे. हृषीकेश पवारने १३ चेंडूत पाच चौकार आणि तेवढेच षटकार ठोकत आपलं अर्धशतक पूर्ण केले. महाराष्ट्र माझा सेवा संस्थेकडून पालकमंत्री चषक टिपीएल टी – २० क्रिकेट स्पर्धेचे आजोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा तिसरा दिवस गोल्डन स्टार क्रिकेट क्लबच्या हृषीकेश पवारने गाजवला.

डीएससीए संघाविरुद्धच्या सामन्यात संघाला एकहाती विजय मिळवून देताना हृषीकेशने सुरुवातीला १२ धावांत ३ विकेट्स आणि फलंदाजीत धडाकेबाज फटकेबाजी करत २९ चेंडूत ८३ धावा केल्या. गोल्डन स्टार क्रिकेट क्लबने प्रतिस्पर्ध्यांचा १० विकेट्सनी धुव्वा उडवत दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. सुरुवातीला ओमनील जाधवच्या नाबाद २९ धावांमुळे डीएससीए संघाला २० षटकात ८ बाद १०४ धावापर्यंत मजल मारता आली.

डीएससीए संघाला मर्यादित धावांवर रोखताना हृषीकेशच्या जोडीने अमोल तनपुरे, शशांक जाधव, मॅक्सवेल स्वामिनाथन आणि महेश जोगळेने प्रत्येकी एक विकेट मिळवली. छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना हृषिकेशने प्रतिस्पर्धी गोलंदाजांना अक्षरशः दे माय धरणी ठाय करून सोडले. हृषीकेशने हल्लाबोल करताना अवघ्या १३ चेंडूत पाच चौकार आणि तेवढेच षटकार ठोकत आपलं अर्धशतक पूर्ण केले.

आपल्या ८३ धावांच्या खेळीत हृषिकेशने आठ चौकार आणि सात षटकारांची आतषबाजी केली. हृषीकेशच्या या कामगिरीमुळे गोल्डन स्टार क्रिकेट क्लबने नवव्या षटकातील चौथ्या चेंडूवर बिनबाद १०५ धावा करत विजय निश्चित केला. दुसऱ्या बाजूने संयमी फलंदाजी करत नाबाद २२ धावा केल्या. सामन्यातील स्टार खेळाडू आणि गेम चेंजर खेळाडू असे दोन्ही पुरस्कार हृषीकेश पवारला देऊन गौरविण्यात आले.


हेही वाचा – Weight Lifting : पुण्याच्या हर्षदा गरुडची उंच झेप, जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक