IPL 2020 : मी स्वतःला काही प्रश्न विचारले; सातत्यपूर्ण कामगिरीबाबत सॅमसनचे विधान

सॅमसनने आतापर्यंतच्या दोन लढतीत ७४ आणि ८५ अशा एकूण १५९ धावा फटकावल्या आहेत.   

sanju samson
संजू सॅमसन

राजस्थानचा रॉयल्सचा यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन हा भारताच्या सर्वात प्रतिभावान युवा क्रिकेटपटूंपैकी एक मानला जातो. तो प्रत्येकच आयपीएल मोसमात काही उत्कृष्ट खेळी करतो. परंतु, त्याला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश येते. यंदा मात्र सॅमसन वेगळ्या रूपात पाहायला मिळत आहे. त्याने आतापर्यंतच्या दोन लढतीत ७४ आणि ८५ अशा एकूण १५९ धावा फटकावल्या आहेत. मी मागील एक वर्ष चांगल्या फॉर्मात आहे, पण तरीही मला सातत्यपूर्ण कामगिरी करता येत नव्हती. मी स्वतःला काही प्रश्न विचारले आणि माझ्या कामगिरीत सुधारणा झाल्याचे सामन्यानंतर सॅमसन म्हणाला.

माझ्याकडे आणखी १० वर्षे आहेत

मागील साधारण एक वर्ष मी चेंडू चांगल्याप्रकारे फटकावत आहे. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. मी आता माझ्या संघाला काही सामने जिंकवून दिल्याचा आनंद आहे. मी मागील काही काळ फॉर्मात होतो, पण मला सातत्यपूर्ण कामगिरी करता येत नव्हती. त्यामुळे मी थोडा निराश होतो. मी स्वतःला काही प्रश्न विचारले. ‘येत्या काळात यश मिळावे यासाठी मी काय केले पाहिजे?’ असा प्रश्न मी स्वतःला विचारला. ‘क्रिकेटपटू म्हणून माझ्याकडे आणखी १० वर्षे आहेत आणि या १० वर्षांत मी माझे शंभर टक्के देऊनच खेळणार,’ असे मी स्वतःशी म्हणालो, असे सॅमसनने सांगितले.

स्मिथने केले सॅमसनचे कौतुक 

सॅमसनने पंजाबविरुद्ध ४२ चेंडूत ८५ धावांची मॅचविनिंग खेळी केली. त्यामुळे राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने सॅमसनचे कौतुक केले. संजू मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फटके लगावत आहे. तो फटकेबाजी करत असल्याने आमच्या इतर फलंदाजांवरील दबाव कमी आपोआपच कमी होतो. तो पुढेही अशीच कामगिरी करत राहील अशी आशा असल्याचेही स्मिथ म्हणाला.