घरक्रीडाIPL : आयपीएल खेळायला मिळत नसल्याचे फारसे दुःख नाही - पुजारा

IPL : आयपीएल खेळायला मिळत नसल्याचे फारसे दुःख नाही – पुजारा

Subscribe

पुजारा २०१४ नंतर आयपीएल स्पर्धेत खेळलेला नाही. 

चेतेश्वर पुजारा हा भारतीय कसोटी संघाचा आधारस्तंभ मानला जातो. तो त्याच्या संथ फलंदाजीसाठी ओळखला जात असल्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मात्र त्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळालेली नाही. आयपीएल या जगातील सर्वात मोठ्या टी-२० स्पर्धेत त्याला केवळ ३० सामने खेळायला मिळाले असून २०१४ नंतर तो या स्पर्धेत खेळलेला नाही. त्याला यंदाही खेळाडू लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. मात्र, आयपीएलमध्ये खेळायला मिळणार नसल्याचे त्याला फारसे दुःख नाही.

फार विचार करत नाही

मी खेळाडू लिलावाचा फारसा विचार करत नाही. हाशिम आमलासारख्या उत्कृष्ट खेळाडूलाही कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. जगात असे बरेच क्रिकेटपटू आहेत, जे टी-२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असतात. मात्र, त्यांना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळत नाही. मला आयपीएलमध्ये नक्कीच खेळायला आवडेल. मात्र, मी या गोष्टीचा फार विचार करत नाही. आयपीएलमध्ये खेळायला मिळत नसल्याचे मला फारसे दुःख नाही, असे पुजाराने सांगितले.

- Advertisement -

संधी तर मिळायला हवी

कसोटी क्रिकेटमध्ये पुजारा संथ गतीने फलंदाजी करत असल्याने तो टी-२० क्रिकेटमध्ये फारसा यशस्वी होऊ शकणार नाही असा लोकांचा समज आहे. याबाबत पुजारा म्हणाला की, बऱ्याच लोकांना वाटते की मी फक्त कसोटी क्रिकेटमध्येच यशस्वी होऊ शकतो. मात्र, त्यांना चुकीचे ठरवण्यासाठी मला संधी तर मिळायला हवी. मी स्थानिक एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी (५४ च्या सरासरीने ४४४५ धावा) केली आहे. स्थानिक टी-२० क्रिकेटमध्येही मी सातत्याने धावा केल्या आहेत. मला क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात खेळायला आवडेल. मात्र, संधी न मिळाल्यास मी स्वतःला सिद्ध करू शकणार नाही.

जे आहे, त्यात समाधान मानतो

पुजाराने आतापर्यंत ७७ कसोटी सामन्यांत १८ शतकांच्या मदतीने ५८४० धावा केल्या आहेत. त्याला एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट नक्कीच खेळायचे आहे. मात्र, तो केवळ कसोटी क्रिकेट खेळण्याबाबतही समाधानी आहे. माझ्याकडे ‘हे नाही, ते नाही,’ असा मी विचार करत नाही. माझ्याकडे जे आहे, त्यात मी समाधान मानतो. ऑफिस क्रिकेटमध्ये इंडियन ऑईलसाठी असो, रणजीमध्ये सौराष्ट्रसाठी असो की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी, मी १०० टक्के देऊनच खेळतो. मी भारताला सामने जिंकवून दिले आहेत. खेळाडूसाठी आपल्या देशाला सामने जिंकवून देण्यापेक्षा मोठे काहीच नसल्याचे पुजारा म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -