माझ्या वैयक्तिक शतकापेक्षा भारत जिंकणे महत्त्वाचे – विराट कोहली

भारताचा कर्णधार विराटने पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, माझ्या चांगल्या कामगिरीपेक्षा जर संघ जिंकला असता तर मला जास्त आनंद झाला असता. मी संघाचा विचार करतो रेकॉर्डचा नाही.

virat kohli
कर्णधार कोहलीची माहिती

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिली कसोटी पराभूत झाल्यानंतर टीम विराट आता दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे. ९ ऑगस्टला होत असलेल्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर आज  पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी विराटने सांगितले की, “मी सामन्यात २०० धावा केल्या त्याचा मला आनंद असला तरी त्यापेक्षा जास्त आनंद आम्ही सामना जिंकलो असतो तर झाला असता. तसेच मी सामना जिंकण्यासाठी खेळतो रेकॉर्डसाठी नाही.”, अशी कबूलीही त्याने यावेळी दिली आहे.

कोणीही शतक केले तरी आनंदच…

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीत विराट सोडला तर एकाही बॅट्समनला चांगली कामगिरी करता आली नाही. विराटला त्याबद्दल विचारले असता त्याने सांगितले की, “मी सामन्यात २०० धावा केल्या त्या माझ्या जागी इतर कोणत्याही बॅट्समनने केल्या असत्या तरी मला तितकाच आनंद झाला असता, कारण या धावा कोणताही खेळाडू स्वत:साठी करत नसून संघासाठी करतो.”

पहिल्या कसोटीत विराटने केले ‘हे’ साध्य

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामन्यात भारत ३१ धावांनी पराभूत झाला. मात्र विराटने पहिल्या डावात केलेल्या १४९ आणि दुसऱ्या डावातील ५१ अशा एकूण २०० धावांच्या जोरावर आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिले स्थान पटकावले. विशेष म्हणजे कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही क्रिकेट फॉर्ममध्ये पहिले स्थान पटकावत कोहलीने एक नवा रेकॉर्ड सेट केला आहे. हे साध्य करणारा तो जगातील नवव्या क्रमांकाचा फलंदाज तर भारताचा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केली होती.

वाचा – टेस्ट रँकिंगमध्ये विराट कोहली झाला नंबर १

virat kohli
विराट कोहली

भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला कसोटी सामन्यात ३१ धावांनी पराभूत झाल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात भारत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरा कसोटी सामना ९ ऑगस्टपासून लॉर्ड्सवर खेळवण्यात येणार असून विराट आणि भारतीय संघ सामन्यासाठी पूर्ण तयार झाला असल्याचेही विराटने पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

वाचा – कोहलीच्या नावे क्रिकेटमधला अजून एक रेकॉर्ड

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संभाव्य संघ

भारत – विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), करुण नायर, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, उमेश यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, चेतेश्वर पुजारा, शार्दूल ठाकूर.

इंग्लंड – जो रूट (कर्णधार), अॅलिस्टर कूक, किटन जेनिंग्स, जॉनी बेरस्टोव, जोस बटलर, आदिल रशीद, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, सॅम करन, मोईन अली, जेमी पोर्टर, क्रिस वोक्स, ऑली पोप.