Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeक्रीडाAFG VS ENG : इब्राहिम एकटा नडला, इंग्लंडसमोर 300 हून अधिक धावांचे लक्ष्य

AFG VS ENG : इब्राहिम एकटा नडला, इंग्लंडसमोर 300 हून अधिक धावांचे लक्ष्य

Subscribe

लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर आज (26 फेब्रुवारी) इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील आठवा सामना खेळवण्यात येत आहे. अफगाणिस्तान संघ कठीण परिस्थितीत असताना सलामीवीर फलंदाज इब्राहिम झद्रानने हशमतुल्लाह शाहिदीसोबत शतकी भागीदारी केली. त्यामुळे अफगाणिस्तान संघाने इंग्लंडसमोर निर्धारीत 50 षटकात 326 धावांचे लक्ष्य दिले आहे.

नवी दिल्ली : लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर आज (26 फेब्रुवारी) इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील आठवा सामना खेळवण्यात येत आहे. अफगाणिस्तान संघ कठीण परिस्थितीत असताना सलामीवीर फलंदाज इब्राहिम झद्रानने हशमतुल्लाह शाहिदीसोबत शतकी भागीदारी केली. यानंतर त्याने इंग्लंड संघासमोर 150 हून अधिक धावा केल्या. महत्त्वाचे म्हणजे 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात झद्रानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले होते. त्याच्या या शानदार खेळीमुळे अफगाणिस्तान संघाने इंग्लंडसमोर निर्धारीत 50 षटकात 326 धावांचे लक्ष्य दिले आहे. (Ibrahim Zadran century sets Afghanistan a target of 326 runs against England)

अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांची सुरुवात खराब झाली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने अफगाणिस्तानला सुरुवातीला तीन धक्के दिले. रहमानउल्लाह गुरबाज (6), सेदिकुल्लाह अटल (4) आणि रहमत शाह (4) धावा काढून बाद झाले. मात्र सलामीवीर इब्राहिम झद्रानने हशमतुल्लाह शाहिदीसोबत सावरला आणि ऐतिहासिक खेळी खेळली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी रचली.

हेही वाचा – Champions Trophy 2025 : माकडेही एवढी केळी खात नाहीत, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची संघावर टीका

शाहिदी 40 धावा करून बाद झाल्यावरही झद्रानने आक्रमक खेळी करत शानदार शतक ठोकले. त्याने 146 चेंडूंत 12 चौकार आणि 6 षटकार मारत 177 ही चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवण्यात यश मिळवले. झद्रानशिवाय अझमतुल्लाह उमरझाईने 31 चेंडूंत 41 धावा आणि मोहम्मद नबीने 24 चेंडूत 40 धावा केल्या. त्यामुळे अफगाणिस्तानला 50 षटकांत 7 बाद 325 धावांपर्यंत पोहोचवता आले. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधित तीन विकेट घेतल्या. तर लियाम लिव्हिंगस्टोनने दोन आणि जेमी ओव्हरटन व आदिल रशीदला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना

इंग्लंड संघाने याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वाेच्च धावसंख्या उभारली. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता इंग्लंडला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या आशा जिवंत ठेवण्यासाठी अफगाणिस्तानच्या फिरकी आव्हानाची कठीण परीक्षा घ्यावी लागणार आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानलाही त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ असा झाला आहे.

हेही वाचा – Champions Trophy 2025 : टीम इंडियाला एकाच मैदानावर खेळण्याचा फायदा, इंग्लंडच्या कर्णधाराने केली टीका