नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेला येत्या 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. पाकिस्तानकडे यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद आहे. मात्र भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्यामुळे ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलनुसार खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे भारताचे सर्व सामने दुबईत खेळवण्यात येणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला आता फक्त 3 दिवस बाकी असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बक्षीसाची रक्कम दोन दिवसांपूर्वी जाहीर केली होती. यानंतर आता आयसीसीने सामन्याच्या अतिरिक्त तिकीट विक्रीची घोषणा केली आहे. (ICC announces additional ticket sales for Champions Trophy 2025 matches)
आयसीसीने 3 फेब्रुवारी रोजी साखळी फेरीतील सामन्यांसाठी तिकीट विक्रीला सुरुवात केली होती. मात्र अवघ्या काही मिनिटात सर्व तिकीटे विकली गेली. याचपार्श्वभूमीवर आता आयसीसीने भारताच्या साखळी फेरीतील तीन सामन्यांसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्य फेरीसाठी अतिरिक्त तिकीट विक्रीची घोषणा केली आहे. अतिरिक्त तिकीट विक्री आज दुपारी 1.30 वाजता (भारतीय वेळेनुसार) विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत.
आयसीसीकडून दिलेल्या माहितीनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 20 फेब्रुवारी रोजी बांग्लादेश विरुद्ध भारताच्या पहिल्या साखळी सामन्यासाठी अतिरिक्त तिकीटे उपलब्ध असतील. याशिवाय, 23 फेब्रुवारी रोजी भारत-पाकिस्तान आणि 2 मार्च रोजी भारत-न्यूझीलंड सामन्याची तिकीटे देखील उपलब्ध असतील. त्याचवेळी, 4 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या उपांत्य फेरीसाठी देखील तिकीटे उपलब्ध असतील. तसेच 9 मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याची तिकीटे पहिल्या उपांत्य फेरीनंतर उपलब्ध होतील, अशी माहिती आयसीसीने दिली आहे. क्रिकेट चाहते ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने तिकीटे खरेदी करू शकणार आहेत.
Additional tickets for #ChampionsTrophy matches in the UAE – including India’s group stage fixtures – will go on sale today 👀
Details ⬇https://t.co/w0ADfGZvJI
— ICC (@ICC) February 16, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताची कामगिरी
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. भारतीय संघाने भारतीय आतापर्यंत चार वेळा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ज्यामध्ये ते 2013 मध्ये चॅम्पियन बनण्यात यशस्वी झाले होते, तर एकदा भारतीय संघ श्रीलंकेसह संयुक्त विजेता राहिला आहे. तर 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता भारतीय संघ 12 वर्षांचा दुष्काळ संपवून पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी मैदानात उतरले.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.