ICC Champions Trophy 2025 मुंबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पाकिस्तान, बांगालादेशनंतर आता इंग्लंडचा संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने 8 धावांनी इंग्लंडवर विजय मिळवला. या विजयानंतर अफगाणिस्तान संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर इंग्लंड अंतिम चारच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. (ICC Champions Trophy 2025 Afghanistan strong innings England were shown the way out of the Champions Trophy)
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या स्पर्धेतील सामने आता रोमांचक होताना पाहायला मिळत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन पाकिस्तान करत आहे. अ गटातून भारतीय संघ आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मात्र, ब गटातील संघांबाबत थेट निकाल लागत नाही आहे. अफगाणिस्तान उपांत्य फेरीपासून एक पाऊल दूर असून, ऑस्ट्रेलियाच्या संघावरही स्पर्धेतून बाद होण्याची टांगती तलवार आहे. कारण अफगाणिस्तान संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असेल तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करावा लागणार आहे. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना 28 फेब्रुवारी रोजी लाहोरमध्ये होणार आहे.
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये कमकुवत समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तान संघाने इंग्लंडचा 8 धावांनी पराभव केला. या पराभवासह जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ स्पर्धेबाहेर पडला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या संघाने फलंदाज इब्राहिम झद्रान याच्या 177 धावांच्या मदतीने 50 षटकांत 7 गडी गमावून 325 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संघ 50 षटकांत 49.5 षटकांत 317 धावांवर सर्वबाद झाला आणि अफगाणिस्तानने 8 धावांनी सामना जिंकला. विक्रमी 177 धावा केल्याबद्दल इब्राहिम झद्रानला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
भारतीय संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आता जर अफगाणिस्तानला उपांत्य फेरी गाठायची असेल तर त्यांच्यासाठी सूत्र अगदी सोपे आहे की, त्यांनी त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियालाचा पराभव करावा लागणार आहे. मात्र, अफगाणिस्तान संघ ऑस्ट्रेलियाला हरवण्यात यशस्वी झाला तर ते 4 गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचतील. जर दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात इंग्लंडला हरवले तर ते 5 गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचतील. अशा परिस्थितीत, दक्षिण आफ्रिका गट ब मध्ये पहिल्या स्थानासह आणि अफगाणिस्तान दुसऱ्या स्थानासह उपांत्य फेरीत जाईल.
दुसरीकडे, गट अ मध्ये जर भारताने शेवटच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडला हरवले. तर ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचेल. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नियम असा आहे की, एका गटातील अव्वल संघ उपांत्य फेरीत दुसऱ्या गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी सामना करेल. जर भारतीय संघ आपल्या गटात अव्वल राहिला आणि अफगाणिस्तान दुसऱ्या क्रमांकावर राहिला, तर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एक उपांत्य सामना पाहायला मिळू शकतो.
हेही वाचा – AFG VS ENG : इब्राहिम एकटा नडला, इंग्लंडसमोर 300 हून अधिक धावांचे लक्ष्य