(ICC Champions Trophy 2025) नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील यजमान पाकिस्तान संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. एकही सामना न जिंकलेल्या पाकिस्तानी संघाच्या खात्यात पावसामुळे एक गुण जमा झाला. पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर बांगलादेशबरोबर पाकिस्तानला प्रत्येकी एक गुण मिळाला. तरीही, यातूनही या संघाला फारसा लाभ झालेला नाही. एका गुणासह (-1.087) पाकिस्तान गट अमध्ये गुणतालिकेत सातव्या किंवा आठव्या स्थानावर राहील, अशी अपेक्षा आहे. या खराब कामगिरीनंतरही कोट्यवधी रुपयांची रक्कम मिळून पाकिस्तानी संघ मालामाल होणार आहे. (Pakistan team will get crores of rupees)
चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होण्यापूर्वी, आयसीसीने स्पर्धेसाठी एकूण 6.9 दशलक्ष डॉलर्सची बक्षीस रक्कम जाहीर केली होती. 2017च्या स्पर्धेच्या तुलनेत ही रक्कम 53 टक्के जास्त असल्याचे आयसीसीने म्हटले आहे.
Rain plays spoilsport as #PAKvBAN is called-off in Rawalpindi ⛈️
More ➡️ https://t.co/sH1r63WCCD pic.twitter.com/hFe6ETayTG
— ICC (@ICC) February 27, 2025
विजेत्या संघाला मिळणार 2.24 दशलक्ष डॉलर्स
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे विजेतेपद जिंकणाऱ्या संघाला 2.24 दशलक्ष डॉलर्स (भारतीय चलनात सुमारे 20 कोटी रुपये) बक्षीस दिले जाईल. उपविजेत्या संघाला 1.12 दशलक्ष डॉलर्स मिळतील. उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या दोन्ही संघांना समान स्वरुपात 560,000 डॉलर बक्षीस दिले जाईल. पाचव्या आणि सहाव्या स्थानावरील संघांनाही बक्षीसापोटी रक्कम 350,000 समान रूपात दिली जाईल.
सातव्या आणि आठव्या क्रमांकावरील संघांनाही बक्षीस
विजेत्या संघांना तर, बक्षीस दिले जाईलच, पण त्याचबरोबर सातव्या आणि आठव्या क्रमांकावर असलेल्या संघांनाही बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या दोन्ही संघांना समान 140,000 डॉलर दिले जातील. या रकमेव्यतिरिक्त, आयसीसीने या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व आठ संघांना 125,000 डॉलर्स देण्याचे आश्वासन दिले आहे.
आताची स्थिती पाहता, पाकिस्तान संघ सातव्या किंवा आठव्या स्थानावर राहण्याची शक्यता आहे. त्याला आयसीसीकडून एकूण 265,000 डॉलर्स (140,000 + 125,000 डॉलर्स) मिळतील. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम सुमारे 2.31 कोटी रुपये आहे. त्यामुळे पाकिस्तानी संघाच्या पदरी लाजिरवाण्या पराभवाबरोबरच कोट्यवधी रुपयांचे बक्षीसही पडणार आहे.