Homeक्रीडाICC : आयसीसीच्या या कृतीमुळे गोलंदाजांना होईल फायदा; फलंदाजांची नाही चालणार मनमानी

ICC : आयसीसीच्या या कृतीमुळे गोलंदाजांना होईल फायदा; फलंदाजांची नाही चालणार मनमानी

Subscribe

सध्या टी-20 क्रिकेट चर्चेत आहे. कारण फलंदाज मोठ मोठे फटके मारून 120 चेंडूच्या सामन्यात 200 किंवा त्याहून अधिक धावा करताना दिसतात. महत्त्वाचे म्हणजे गोलंदाज चेंडू टाकायच्या आधीच फलंदाज वेगळा शॉट मारण्याचा प्रयत्न करताना दिसतात. बहुतेक वेळा चेंडू वाइड जातो. त्यामुळे गोलंदाजांना फायदा होईल, असा नियम आयसीसी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू आणि संघाचा माजी कर्णधार शॉन पोलॉक याने दिली आहे.

नवी दिल्ली : सध्या टी-20 क्रिकेट चर्चेत आहे. कारण फलंदाज मोठ मोठे फटके मारून 120 चेंडूच्या सामन्यात 200 किंवा त्याहून अधिक धावा करताना दिसतात. महत्त्वाचे म्हणजे गोलंदाज चेंडू टाकायच्या आधीच फलंदाज वेगळा शॉट मारण्याचा प्रयत्न करताना दिसतात. बहुतेक वेळा चेंडू वाइड जातो. त्यामुळे गोलंदाजांना चेंडू नेमका कुठे टाकावा हे समजत नाही. मात्र आता फलंदाजांना मैदानावर आपली मनमानी करता येणार नाही. कारण आयसीसी गोलंदाजांना फायदा होईल, असा नियम करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू आणि संघाचा माजी कर्णधार शॉन पोलॉक याने दिली आहे. (ICC Cricket Committee member Shaun Pollock said that a big decision will be taken regarding bowlers)

एक वृत्तसंस्थेशी संवाद साधताना शॉन पोलॉक म्हणाला की, मी सध्या आयसीसी क्रिकेट समितीचा भाग आहे आणि आम्ही गोलंदाजांना वाइड बॉलवर आणखी काही सवलती देण्याचा विचार करत आहोत. कारण मला वाटते की, गोलंदाजांसाठी वाइट चेंडू संबंधीचे नियम खूप कडक आहेत. जर एखाद्या फलंदाजाने शेवटच्या क्षणी आपल्या खेळण्याचा अंदाज बदलला तर गोलंदाजांसाठी खरोखरच कठीण परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे मला वाटतं की, गोलंदाजांना त्यांच्या रन-अपच्या सुरुवातीलाच ते कुठे गोलंदाजी करू शकतात, हे माहित असणे महत्त्वाचे आहे.

शॉन पोलॉक म्हणाला की, सध्याच्या नियमांनुसार, जर गोलंदाजाने हातातून चेंडू सोडण्यापूर्वी फलंदाजाने त्याची खेळण्याची स्थिती बदलली तर चेंडू वाइड घोषित केला जातो. त्यामुळे या नियमात थोडा बदल व्हावा, अशी माझी इच्छा आहे. कारण गोलंदाजाला रन-अप दरम्यान, कधी, कुठे आणि कोणत्या प्रकारचा चेंडू टाकायचा आहे, हे माहिती असते. गोलंदाजी करताना शेवटच्या सेकंदाला गोलंदाजाकडून त्याची रणनीती बदलण्याची अपेक्षा कशी काय केली जाऊ शकते? त्यामुळे गोलंदाजी कुठे करायची आहे, याची गोलंदाजाला आधीच स्पष्ट कल्पना असायला हवी. आम्ही या गोष्टीवर चर्चा करत आहोत, अशी माहिती पोलॉक यांनी दिली.

चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल काय म्हणाला पोलॉक?

दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ कसा असेल? असा प्रश्न विचारला असता, शॉन पोलॉक म्हणाला की, आमच्या संघात असे अनेक खेळाडू आहेत जे आयपीएलमध्ये खेळत आहेत आणि त्यांना उपखंडातील परिस्थितीची चांगली जाणीव आहे. हे खेळाडू दक्षिण आफ्रिकेला मदत करू शकतात. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान उपखंडीय परिस्थितीत त्यांच्या खेळाडूंच्या अनुभवाचा फायदा घ्यावा. तसेच आमच्या संघात बहुतेक तेच खेळाडू आहेत, जे 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये खेळले होते. त्यामुळे आम्ही उपांत्य फेरीत पोहोचलो होतो, मात्र आम्हाला ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले. असे असले तरी आता आम्ही जागतिक कसोटी चॅम्पियनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आशा आहे की, काही तरुण खेळाडू उदयास येतील. त्यामुळे माझ्या देशाचे कसोटी क्रिकेट आणखी बळकट होईल.