घरक्रीडागतविजेते विरुद्ध यजमान!

गतविजेते विरुद्ध यजमान!

Subscribe

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना आज

गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि यजमान इंग्लंड या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील दुसरा सामना गुरुवारी रंगणार आहे. हा सामना एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे होईल. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने सातत्यपूर्ण कामगिरी केली असून त्यांना ९ पैकी ७ साखळी सामने जिंकण्यात यश आले. इंग्लंडचा या स्पर्धेतील प्रवास मात्र चढ-उतारांनी भरलेला होता. त्यांनी सुरुवातीच्या ७ सामन्यांपैकी ३ सामने गमावल्यामुळे त्यांना अखेरचे २ सामने जिंकणे अनिवार्य झाली आणि त्यांनी हे सामने जिंकत आगेकूच केली. ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या इतिहासात अजून एकदाही उपांत्य फेरीतील सामना गमावलेला नाही. त्यामुळे इंग्लंडला ऑस्ट्रेलियाची ही विजयी मालिका खंडित करत अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे.

मागील विश्वचषकाची (२०१५) बाद फेरी गाठण्यात अपयश आल्यानंतर इंग्लंडने आपल्या खेळण्याच्या पद्धतीत आणि संघात बदल केला. या बदलांमुळे इंग्लंडला मागील चार वर्षांत बरेच यश मिळाले आहे. मात्र, हे बदल त्यांनी या घरच्या मैदानावर होणार्‍या विश्वचषकात चांगले प्रदर्शन करण्याच्या दृष्टीने केले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी या उपांत्य फेरीतील सामन्याचे विशेष महत्त्व आहे. या विश्वचषकाची अडखळती सुरुवात केल्यानंतर मागील दोन सामन्यांत त्यांनी भारत आणि न्यूझीलंड या संघांना पराभूत केले. या दोन्ही सामन्यांत त्यांचे सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी शतकी भागीदारी केली. या दोघांना जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी चांगली साथ दिली आहे. मात्र, इतर फलंदाजांना सातत्याने धावा करण्यात अपयश आले. त्यामुळे उपांत्य फेरीच्या सामन्यात सलामीच्या जोडीवरील जबाबदारी अधिकच वाढणार आहे. या दोन संघांमध्ये झालेल्या साखळी सामन्यात रॉय दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. बेअरस्टो, रूट आणि मॉर्गनही या सामन्यात झटपट माघारी परतले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांचा डाव २२१ धावांत आटोपला आणि त्यांनी हा सामना ६४ धावांनी गमावला. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्यासाठी त्यांना आपल्या खेळात सुधारणा करावी लागेल.

- Advertisement -

त्या सामन्यात डेविड वॉर्नर आणि कर्णधार अ‍ॅरॉन फिंच या सलामीवीरांनी शतकी भागी केली होती. या दोघांनी या संपूर्ण स्पर्धेतच दमदार कामगिरी केली आहे. वॉर्नर सध्या ६३८ धावांसह सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत दुसर्‍या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाजही या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहेत. खासकरून मिचेल स्टार्कने आपल्या वेगाने सर्वांनाच अडचणीत टाकले आहे. त्याने आतापर्यंत २६ विकेट्स घेतल्या असून तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याला कमिन्स (१३ विकेट्स) आणि बेहरनडॉर्फ (९ विकेट्स) यांनी चांगली साथ दिली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला आपली उपांत्य फेरीतील विजयी मालिका सुरु ठेवण्यासाठी या गोलंदाजांनी सर्वोत्तम खेळ करत रहाणे गरजेचे आहे.

इंग्लंड : इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, जॉस बटलर (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, क्रिस वोक्स, मोईन अली, आदिल रशीद, लियम प्लंकेट, जोफ्रा आर्चर, टॉम करन, मार्क वूड, जेम्स विन्स, लियम डॉसन.

- Advertisement -

ऑस्ट्रेलिया : अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), डेविड वॉर्नर, मॅथ्यू वेड, स्टिव्ह स्मिथ, अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, नेथन कुल्टर-नाईल, पॅट कमिन्स, जेसन बेहरनडॉर्फ, केन रिचर्डसन, अ‍ॅडम झॅम्पा, नेथन लायन, पीटर हँड्सकॉम्ब.

विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील कामगिरी

ऑस्ट्रेलिया
सामने : ७
विजय : ६
पराभव : ०
बरोबरीत : १

इंग्लंड
सामने : ५
विजय : ३
पराभव : २

विश्वचषकात ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड

सामने : ८
ऑस्ट्रेलिया विजयी : ६
इंग्लंड विजयी : २

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -