ICC ने जाहीर केले रँकिंग, भारत ‘या’ फाॅरमॅटमध्ये अव्वल

आयसीसी पुरुषांच्या कसोटी संघ क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतावरील आघाडी एका गुणावरून नऊपर्यंत वाढवली आहे, तर पाकिस्तानचा संघ इंग्लंडच्या जागी पाचव्या स्थानावर आहे.

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटची वार्षिक क्रमवारी आयसीसीने जाहीर केली आहे. या क्रमवारीनुसार, कसोटीमध्ये ऑस्ट्रेलिया, एकदिवशीय सामन्यांमध्ये न्यूझीलंड आणि टी 20 मध्ये भारत (Team India) पहिल्या क्रमांकावर आहे. कसोटीमध्ये  भारत दुसऱ्या आणि एकदिवशीयमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

आयसीसी पुरुषांच्या कसोटी संघ क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतावरील आघाडी एका गुणावरून नऊपर्यंत वाढवली आहे, तर पाकिस्तानचा संघ इंग्लंडच्या जागी पाचव्या स्थानावर आहे. कसोटी क्रमवारीत न्यूझीलंड तिसऱ्या तर दक्षिण आफ्रिका चौथ्या स्थानावर आहे.

भारतीय संघाने गेल्या काही महिन्यांत देशांतर्गत टी-20 स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. टी-20 क्रमवारीत भारताला त्याचा फायदा झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अव्वल स्थान पटकावले आहे. भारतीय संघाने क्रमवारीत इंग्लंडवर पाच गुणांची आघाडी घेतली आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेला पराभूत केले आहे. गेल्या वर्षी विश्वचषकानंतर शर्माने विराट कोहलीच्या जागी कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. सलग विजयांमुळे भारताचे गुण वाढले. युएई आणि ओमान येथे 2021 मध्ये झालेल्या आयसीसी टी 20 विश्वचषक स्पर्धेत निराशजनक कामगिरी केली होती.पहिल्याच राऊंडमध्ये टीम इंडिया बाहेर गेली होती. पण रोहित शर्माच्या हातात कर्णधारपद आल्यानंतर टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर पोहोचण्यात यशस्वी झाली आहे.

टी 20 क्रमवारीत भारताचे आता 270 गुण आहेत, तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडचे 265 गुण आहेत. पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे अनुक्रमे २६१, २५३ आणि २५१ गुणांसह तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. न्यूझीलंड 250 गुणांसह दोन स्थाने घसरून सहाव्या क्रमांकावर आला आहे. वेस्ट इंडिज (240 गुण) सातव्या स्थानावर कायम आहे. बांगलादेश (233 गुण) आणि श्रीलंका (230 गुण) अनुक्रमे आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत. अफगाणिस्तान (२२६) अव्वल १० मधून बाहेर पडला आहे.