Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
Homeक्रीडाICC Champions Trophy : आयसीसी म्हणजे आता इंडियन क्रिकेट बोर्ड, वेस्ट इंडिजच्या माजी कर्णधाराचे गंभीर आरोप

ICC Champions Trophy : आयसीसी म्हणजे आता इंडियन क्रिकेट बोर्ड, वेस्ट इंडिजच्या माजी कर्णधाराचे गंभीर आरोप

Subscribe

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 टीम इंडियाने आपल्या नावावर केले. यावेळी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद हे पाकिस्तानकडे होते. पण, भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यानंतर या स्पर्धेसाठी हायब्रीड मॉडेल आणले गेले. यावेळी भारतीय संघांचे सामने हे दुबईमध्ये खेळवले गेले. तर, इतर संघांचे सामने हे पाकिस्तानमध्येच तीन वेगवेगळ्या मैदानावर खेळवण्यात आले. यावरून संपूर्ण स्पर्धेमध्ये अनेकदा इतर संघाच्या खेळाडूंनीही आयसीसी तसेच भारतीय संघावर टीका केली होती. भारतीय संघाला एकाच मैदानावर खेळण्याचा फायदा होत असल्याचे अनेक खेळाडूंनी म्हटले. असे असतानाही या सर्व टिकांकडे दुर्लक्ष करत भारतीय संघाने इतिहास रचला. आता पुन्हा एकदा वेस्ट इंडिजच्या ज्येष्ठ क्रिकेटपटूने आयसीसीवर टीका केली आहे. (ICC stands for Indian Cricket Board now says West Indies Andy Robert slams)

हेही वाचा : ICC Champions Trophy : सर्वोत्तम संघ! भारताच्या विजयानंतर पाकिस्तानच्या माजी खेळाडूकडून कौतुकाचा वर्षाव; म्हणाला, गेल्या 10 वर्षात…

“माझ्यासाठी आयसीसी म्हणजे इंडियन क्रिकेट बोर्ड झाले आहे. भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात आयसीसीने मोठी भूमिका बजावली आहे. भारताच्या फायद्यासाठी आयसीसी कोणत्याही थराला जाऊ शकते.” असे म्हणत वेस्ट इंडीजचे ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार अँडी रॉबर्ट्स यांनी टीका केली आहे. ते पुढे म्हणाले की, “यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सर्व मागण्या मान्य केल्या. 2024 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकातही जेतेपद जिंकण्यात आयसीसीचा मोठा वाटा आहे. तेव्हा भारताला आधीच माहित होते की ते गयानामध्ये खेळवण्यात येणार आहे. ही असली प्रकरणे थांबायला हवीत.” असे म्हणत त्यांनी मोठा आरोप केला आहे.

“भारताकडून खूप पैसे आयसीसीकडे येत आहे हे मान्य, पण क्रिकेट हे फक्त एका देशाचे होऊ नये,” असा सणसणीत टोला अँडी रॉबर्ट्स यांनी लगावला. “भारताकडे सर्व काही असू शकत नाही. आयसीसीने कधीकधी भारताला नाही म्हणायलाही शिकावे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताला अजिबात प्रवास करावा लागला नाही. स्पर्धेदरम्यान एका संघाने अजिबात प्रवास केला नाही आणि इतर संघांना वेगवेगळ्या देशांमध्ये जावे लागले, हे निंदनीय.” असे म्हणत अँडी रॉबर्ट्स यांनी टीका केली. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील अंतिम सामना हा दुबईमध्ये खेळवण्यात आला. यावेळी भारतीय संघाने न्यूझीलंडवर 4 विकेट्सनी विजय मिळवला. तसेच, तब्बल 12 वर्षांनी पुन्हा एकदा जेतेपद पटकावले.