Test Rankings : लॉर्ड्सवरील दमदार कामगिरीचा सिराजला फायदा; तब्बल १८ स्थानांची बढती

सिराजने दोन्ही डावांत चार-चार विकेट घेतल्या.

mohammed siraj
मोहम्मद सिराजला क्रमवारीत बढती

भारतीय संघाने लॉर्ड्सवर (Lord’s) झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा १५१ धावांनी पराभव केला. भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने महत्त्वाची भूमिका बजावली. सिराजने दोन्ही डावांत चार-चार विकेट घेण्याची कामगिरी केली. या दमदार कामगिरीचा त्याला आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत फायदा झाला आहे. सिराजला गोलंदाजांच्या यादीत तब्बल १८ स्थानांची बढती मिळाली असून तो ३८ व्या स्थानावर पोहोचला आहे. मागील वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सिराजने आतापर्यंत ७ कसोटी सामन्यांच्या १४ डावांत २७ विकेट घेतल्या आहेत. जागतिक क्रमवारीत तो सध्या भारताचा आठवा सर्वोत्तम गोलंदाज आहे.

सिराजचा प्रभावी मारा

क्रिकेटमधील सर्वात ऐतिहासिक मैदान अशी ओळख असलेल्या लॉर्ड्सवर सिराजने उत्कृष्ट गोलंदाजी केली. पाचव्या दिवशी इंग्लंडचा संघ सामना अनिर्णित राखणार असे वाटत होते. परंतु, सिराजने आधी मोईन अली आणि सॅम करन, नंतर जॉस बटलर आणि जेम्स अँडरसन यांना एकाच षटकात बाद करत भारताला विजय मिळवून दिला. त्याला जसप्रीत बुमराहने तीन विकेट घेत उत्तम साथ दिली. बुमराहने पहिल्या कसोटीत दोन डावांत मिळून नऊ विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे त्याने १९ व्या स्थानावरून थेट नवव्या स्थानावर झेप घेतली होती. परंतु, लॉर्ड्स कसोटीनंतर त्याची दहाव्या स्थानी घसरण झाली आहे.

कोहली पाचव्या स्थानी कायम 

फलंदाजांमध्ये लॉर्ड्स कसोटीतील शतकवीर लोकेश राहुलला १९ स्थानांची बढती मिळाली असून त्याने ३७ वे स्थान पटकावले आहे. तसेच कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी अनुक्रमे पाचवे आणि सहावे स्थान राखले आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. रूटने पहिल्या कसोटीत ६४ आणि १०९ धावांची, तर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात नाबाद १८० धावांची खेळी केली. त्यामुळे तो दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन अव्वल स्थानावर आहे.