Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा Test Rankings : जे कोणत्याही भारतीय यष्टिरक्षकाला जमले नाही, ते रिषभ पंतने करून...

Test Rankings : जे कोणत्याही भारतीय यष्टिरक्षकाला जमले नाही, ते रिषभ पंतने करून दाखवले!

कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीने आपले पाचवे स्थान कायम राखले आहे.

Related Story

- Advertisement -

भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. या कामगिरीसह त्याने अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. कसोटी क्रमवारीत अव्वल दहा फलंदाजांमध्ये प्रवेश करणारा पंत हा भारताचा पहिलाच यष्टीरक्षक-फलंदाज ठरला. भारताच्या क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनीलासुद्धा ही कामगिरी जमली नव्हती. कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपले पाचवे स्थान कायम राखले आहे. तसेच पंतप्रमाणेच भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि न्यूझीलंडचा हेन्री निकोल्स सहाव्या स्थानी असून या तिघांचेही ७४७ गुण आहेत.

पंतची दमदार कामगिरी 

पंतला कारकिर्दीच्या सुरुवातीला चांगली कामगिरी करण्यात अपयश येत होते. तसेच तो बरेचदा चुकीचे फटके मारून बाद व्हायचा. त्यामुळे त्याच्यावर बरेचदा टीकाही झाली. परंतु, मागील काही महिन्यांत त्याच्या फलंदाजीत खूप सुधारणा झाली असून त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन कसोटी सामन्यांत मॅचविनिंग खेळी केल्या होत्या. तसेच भारतीय संघ अडचणीत असताना त्याने इंग्लंडविरुद्ध अखेरच्या कसोटीत १०१ धावांची अप्रतिम खेळी केली होती. या दमदार कामगिरीमुळेच त्याने सहाव्या स्थानी झेप घेतली आहे.

विल्यमसन अव्वल स्थानी 

- Advertisement -

कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत कोहली, रोहित आणि पंत हे तीन भारतीय अव्वल दहामध्ये आहेत. या यादीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन अव्वल स्थानावर आहे. तसेच नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत एक द्विशतक आणि एक शतक करणारा श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणरत्नेला चार स्थानांची बढती मिळाली असून तो ११ व्या स्थानी पोहोचला आहे.

- Advertisement -