अपयशी झालो, तर मी पुन्हा कधीही तुमच्याकडे येणार नाही!

सचिनने दिला आठवणींना उजाळा

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने, धावा, शतके असे असंख्य विक्रम आहेत. १९८९ साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या सचिनला सुरुवातीची काही वर्षे मधल्या फळीत खेळावे लागले. मात्र, १९९४ मध्ये नवज्योत सिंग सिद्धूला दुखापत झाल्यानंतर सचिन पहिल्यांदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळला. परंतु, ऑकलंड येथे झालेल्या या सामन्यात सचिनला संधी मिळाली नाही, तर त्याने ती कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि संघ व्यवस्थापक अजित वाडेकर यांच्याकडे मागून घेतली.

आम्ही सामन्यासाठी जेव्हा सकाळी हॉटेल सोडले, तेव्हा मी सलामीला खेळणार असल्याचे मला माहित नव्हते. आम्ही मैदान गाठले. अझर आणि वाडेकर सर आधीच ड्रेसिंग रुममध्ये बसले होते. ते म्हणाले की, सिद्धू फिट नसून त्याच्या मानेला दुखापत झाली आहे. त्याच्या अनुपस्थितीत सलामीला कोण खेळणार असा प्रश्न त्यांनी केला. मला एक संधी द्या, अशी मी अझर आणि वाडेकर सरांना विनंती केली. यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया होती की, तुला का सलामीला खेळायचे आहे? मात्र,मी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवू शकतो अशी मला खात्री होती, असे सचिन म्हणाला.

तसेच त्याने पुढे सांगितले, मी सुरुवातीला फटकेबाजी करुन माघारी परतेन असे नव्हते. मी माझा नैसर्गिक खेळ करत मोठी खेळी करु शकतो असा मला विश्वास होता. १९९२ विश्वचषकापर्यंत केवळ मार्क ग्रेटबॅच हेच सुरुवातीपासून आक्रमक शैलीत खेळायचे. अन्यथा सर्व सलामीवीर नव्या चेंडूविरुद्ध संयमाने फलंदाजी करत पहिली १५ षटके खेळून काढायचा प्रयत्न करायचे. त्यानंतर हळहळू धावांची गती वाढवून अखेरच्या ७-८ षटकांत फटकेबाजी करायचे. परंतु, मी पहिल्या १५ षटकांत गोलंदाजांवर दबाव टाकू शकतो असे मला वाटत होते. त्यामुळे मी अझर आणि वाडेकर सरांकडे संधी मागितली. तसेच जर अपयशी झालो, तर मी पुन्हा कधीही तुमच्याकडे येणार नाही असेही म्हणालो होतो. सुदैवाने मला यश मिळाले.