चांगले प्रशिक्षक नसल्यास, पुढची सिंधू घडणार कशी?

राष्ट्रीय प्रशिक्षक गोपीचंद यांचा सवाल

भारताच्या पी. व्ही. सिंधूने नुकत्याच झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. जागतिक स्पर्धा जिंकणारी ती पहिला बॅडमिंटन खेळाडू आहे. तसेच पुरुषांमध्ये साई प्रणितने कांस्यपदकाची कमाई केली. या दोघांसह सायना नेहवाल, एच.एस. प्रणॉय यांसारख्या बॅडमिंटनपटूंनी मागील काही वर्षांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या सर्व खेळाडूंना राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांचे मार्गदर्शन लाभले आहे. मात्र, गोपीचंद सोबत नसताना सिंधूला तितकीशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. गोपीचंद राष्ट्रीय प्रशिक्षक असल्यामुळे ते सिंधू, सायनासारख्या खेळाडूंसोबत सातत्याने राहू शकत नाही. त्यांच्या अनुपस्थितीत भारतातील युवा बॅडमिंटनपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी इतर फारसे प्रशिक्षक नाहीत. भारतात चांगल्या बॅडमिंटन प्रशिक्षकांची कमतरता असणे ही चिंतेची गोष्ट आहे, असे मत गोपीचंद यांनी व्यक्त केले.

भारतामध्ये चांगल्या प्रशिक्षकांची कमतरता आहे. प्रशिक्षक घडावेत यासाठी पुरेशा सुविधा पुरवल्या जात नाहीत. चांगले प्रशिक्षक घडवण्याकडे आपण दुर्लक्ष करतो. सिंधू, सायनासारखे मोठे खेळाडू पुढेही व्हावेत अशी इच्छा असेल, तर चांगले प्रशिक्षक असणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे आपण प्रशिक्षक घडवण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. आताच्या पिढीतील हे खेळाडू निवृत्त झाले की ते प्रशिक्षणाकडे वळतील, अशी मला आशा आहे. प्रशिक्षकांबाबतचा प्रश्न असा आहे, ज्याला सोपे उत्तर नाही. आपल्याकडे जोपर्यंत पुरेसे प्रशिक्षक होत नाहीत, तोपर्यंत आपल्याला परदेशी प्रशिक्षकांची गरज पडणार, असे गोपीचंद म्हणाले.

आता बॅडमिंटन स्पर्धांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या कारणामुळेही जास्त प्रशिक्षक असणे आवश्यक आहे, असे माजी ऑल-इंग्लंड स्पर्धा विजेत्या गोपीचंद यांना वाटते. याबाबत त्यांनी सांगितले, प्रशिक्षकांची कमतरता असण्याला आपणच कारणीभूत आहोत. बॅडमिंटनमध्ये आपल्या देशाने झपाट्याने प्रगती केली आहे. मात्र, आपल्याकडील सुविधांमध्ये तितक्या झपाट्याने वाढ झालेली नाही. ही आपल्यासाठी चिंतेची गोष्ट आहे.