घरक्रीडादव पडले नाही, तरच डे-नाईट कसोटीचा फायदा!

दव पडले नाही, तरच डे-नाईट कसोटीचा फायदा!

Subscribe

क्रिकेट चाहते कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवत असल्याने काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) डे-नाईट (प्रकाशझोतात) कसोटी सामने खेळण्यास सुरुवात केली. भारताने मात्र अजून एकही डे-नाईट कसोटी सामना खेळलेला नाही. परंतु, बीसीसीआयचा नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुलीच्या पुढाकारामुळे अखेर भारत २२ नोव्हेंबरला कोलकाता येथे बांगलादेशविरुद्ध आपला पहिलावहिला डे-नाईट कसोटी सामना खेळणार आहे. दव पडले नाही, तरच हा डे-नाईट कसोटी सामना यशस्वी होईल, असे मत भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.

दव पडले नाही, तरच हा डे-नाईट कसोटी सामना यशस्वी होईल. दव पडले, तर वेगवान गोलंदाज आणि खासकरून फिरकीपटूंसाठी गोलंदाजी करणे आव्हानात्मक होईल. चेंडू एकदा का ओला झाला की, गोलंदाजांना मदत मिळणे बंद होते. त्यामुळे गोलंदाजांची खर्‍या अर्थाने कसोटी लागेल, असे सचिन म्हणाला.

- Advertisement -

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर डे-नाईट एकदिवसीय सामन्यांमध्ये दव पडायचे असेही सचिनने सांगितले. कसोटी सामन्यादरम्यान दव पडेल असा माझा अंदाज आहे. मात्र, दव किती असणार हे आधी आपण शोधले पाहिजे. दोन्ही संघ कसे खेळतात हे दवच ठरवेल. वातावरणाचा सामन्यावर परिणाम होता कामा नये असे मला वाटते, असे सचिनने स्पष्ट केले.

डे-नाईट कसोटी सामन्यांना चाहते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील असे गांगुलीचे मत आहे आणि सचिन त्याच्याशी सहमत आहे. तुम्ही डे-नाईट कसोटी सामन्याकडे दोन बाजूंनी पाहू शकता. एक बाजू म्हणजे प्रेक्षकांची. प्रेक्षकांना आपली कामे संपवून डे-नाईट कसोटी सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहता येईल. दुसरी बाजू म्हणजे खेळाडूंची. भारताच्या खेळाडूंना पहिल्यांदा गुलाबी चेंडूने खेळण्याची संधी मिळेल. त्यांना लाल आणि गुलाबी चेंडूत काय फरक आहे याचाही अंदाज येईल.

- Advertisement -

तसेच फलंदाजांनी गुलाबी चेंडूचा सामना करण्याआधी कशी तयारी केली पाहिजे, असे विचारले असता सचिनने सांगितले, फलंदाजांनी सराव करताना विविध चेंडूंचा वापर केला पाहिजे. त्यांनी नवा गुलाबी चेंडू, २० षटकांनंतरचा गुलाबी चेंडू, ५० षटकांनंतरचा गुलाबी चेंडू आणि ८० षटकांनंतरच्या गुलाबी चेंडूने सराव केला पाहिजे. त्यामुळे ठराविक षटकांनंतर चेंडू कशी हालचाल करत आहे हे त्यांना कळेल. त्याप्रमाणे ते योजना आखू शकतील.

संध्यकाळच्या वेळी फलंदाजी आव्हानात्मक -साहा

डे-नाईट कसोटी सामन्यात संध्याकाळच्या वेळी फलंदाजी करणे आव्हानात्मक असते, असे विधान भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाने केले. साहाने याआधी स्थानिक क्रिकेटमध्ये डे-नाईट कसोटी सामना खेळला आहे. प्रकाशझोतात चेंडू जास्त स्विंग होतो. आमचे गोलंदाज सध्या अप्रतिम गोलंदाजी करत आहेत आणि ते त्यांनी या परिस्थितीत गोलंदाजी करायला मजा येईल. गुलाबी चेंडू जेव्हा जुना होतो, तेव्हा फलंदाजी करणे आव्हानात्मक होते. खासकरून संध्याकाळच्या वेळी फलंदाजी करताना अडचण येऊ शकते, असे साहा म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -