Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
Homeक्रीडाIND VS PAK : कोणता संघ जिंकणार? आयआयटी बाबाच्या भविष्यवाणीमुळे चाहत्यांचा संताप

IND VS PAK : कोणता संघ जिंकणार? आयआयटी बाबाच्या भविष्यवाणीमुळे चाहत्यांचा संताप

Subscribe

महाकुंभ मेळ्यात प्रसिद्ध झालेला आयआयटी बाबा अभय सिंहने भारत आणि पाकिस्तान सामन्याबाबत भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांचा आनंदात सामन्याआधीच मिठाचा खडा पडला आहे.

नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात झाली असून दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात भारताने बांग्लादेशचा 6 विकेट्स राखून पराभव केला. यानंतर आता भारतीय संघाला 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानचा सामना करायचा आहे. या सामन्याची भारत आणि पाकिस्तानसह जगभरातील क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच महाकुंभ मेळ्यात प्रसिद्ध झालेला आयआयटी बाबा अभय सिंहने भारत आणि पाकिस्तान सामन्याबाबत भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांचा आनंदात सामन्याआधीच मिठाचा खडा पडला आहे. (IIT Baba makes prediction about India vs Pakistan match in ICC Champions Trophy)

एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आयआयटी बाबा अभय सिंहने दावा केला की, रविवारी होणाऱ्या सामन्यात भारताचा पाकिस्तानसमोर टिकाव लागणार नाही. विराट कोहली किंवा रोहित शर्माने कितीही प्रयत्न केले तरी भारत हा सामना जिंकणार नाही. मी म्हणतोय भारत नाही जिंकणार तर नाही जिंकणार. पाकिस्तान भारताचा पराभव करेल. आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धा मी जिंकून दिली होती, असा दावा त्याने केला आहे. त्याने म्हटले की, मी रोहितला सांगितले होते की, कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यायची. पण आता सगळं मी उलटं केलं आहे. यावेळेस भारत हरणार हे नक्की आहे.

हेही वाचा – Ranji Trophy : सूर्या, दुबे, शार्दुल ठाकूरसारखे स्टार खेळाडू असूनही मुंबई स्पर्धेबाहेर, या संघामध्ये होणार Final

अभय सिंहच्या या भविष्यवाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भारतीय चाहते त्याच्या भविष्यवाणीवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत. एका युझरने म्हटले की, मी तुम्हाला 23 फेब्रुवारीच्या रात्री उत्तर देईल. दुसऱ्या युझरने म्हटले की, मला कर्मावर विश्वास नाही पण रोहित शर्मावर पूर्ण विश्वास आहे. तर आणखी एका युझरने म्हटले की, भारत जिंकला किंवा हरला तरीही मी तुला उत्तर देईल.

कोण आहे आयआयटी बाबा?

आयआयटी बाबा उर्फ अभय सिंह याचा जन्म हरियाणामध्ये झाला असून तो तिथेच लहानाचा मोठा झाला आहे. त्याने डिझाइनमध्ये मास्टर (एम.डी.एस.) केले असून छायाचित्रकार म्हणूनही काम केले आहे. त्याने आयआयटी बॉम्बेमधून शिक्षण घेतले आहे. 2008 ते 2012 च्या बॅचमध्ये त्याने एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केले. मात्र त्याने यानंतर अभियांत्रिकीऐवजी आध्यात्मिक जीवन जगण्याचा निर्णय घेतला.