मी धोनीच्या खेळाचा चाहता – सोधी

सोधी

आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फिनिशरपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याने अनेकवेळा भारताला आणि चेन्नईलाही कठीण परिस्थिती सामने जिंकवून दिले आहे. तसेच टी-२० हा क्रिकेटचा प्रकार वेगासाठी ओळखला जात असला तरी त्यातही धोनी खेळाच्या वेगावर नियंत्रण ठेवतो. याच गोष्टीमुळे मी धोनीच्या खेळाचा चाहता आहे, असे राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा न्यूझीलंडचा लेगस्पिनर ईश सोधी म्हणाला.

कोणत्या परिस्थितीत काय केले पाहिजे ही गोष्ट माहित असणे खूप महत्त्वाचे असते. खेळाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आणि खेळाचा वेग योग्यवेळी कमी करणे या गोष्टी मी धोनीच्या खेळातून शिकण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या खेळाचा मी चाहता आहे. त्याच्यासारखा खेळाडू तुम्हाला प्रत्येक सामना जिंकवलेच असे नाही, पण तो सातत्यपूर्ण कामगिरी नक्कीच करेल, असे सोधी म्हणाला.

सोधीची इंग्लंडमध्ये होणार्‍या विश्वचषकासाठी न्यूझीलंडच्या संघात निवड झाली आहे. तो सध्या आयपीएलमध्ये खेळत आहे. आयपीएल विश्वचषकाच्या काहीच दिवस आधी संपणार असल्याने याचा खेळाडूंच्या फिटनेसवर परिणाम होऊ शकेल असे काहींचे मत आहे. याबाबत सोधी म्हणाला, योग्यप्रकारे सराव केला, तर फिटनेसवर परिणाम होणार नाही असे मला वाटते. मी मागील काही वर्षे खूप चांगल्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. मी स्वतःच्या खेळात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे.