घरक्रीडासौरव गांगुली नाही, धोनी भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार!

सौरव गांगुली नाही, धोनी भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार!

Subscribe

धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ टी-२० आणि २०११ एकदिवसीय असे दोन विश्वचषक जिंकले. 

सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यापैकी भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार कोण?, याबाबत चाहते आणि क्रिकेट समीक्षकांमध्ये वारंवार चर्चा रंगत असते. नुकताच धोनी (७ जुलै) आणि गांगुली (८ जुलै) यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरील एका कार्यक्रमात या दोघांमधील सर्वोत्कृष्ट कर्णधार ठरवण्यासाठी एक सर्वेक्षण घेण्यात आले, ज्यात धोनीने बाजी मारली. या सर्वेक्षणात ग्रॅमी स्मिथ, कुमार संगकारा, गौतम गंभीर, इरफान पठाण आणि कृष्णमचारी श्रीकांत यांसारख्या माजी खेळाडूंनीही सहभाग घेतला होता.

आठ विभागांमध्ये तुलना

धोनी आणि गांगुलीची आठ विभागांमध्ये तुलना करण्यात आली. कर्णधार म्हणून परदेशात कामगिरी, कर्णधार झाल्यानंतर संघाच्या कामगिरीत सुधारणा, संघ तयार केल्यामुळे पुढील कर्णधाराला किती यश आणि एकूण प्रभाव या चार विभागांत गांगुलीला धोनीपेक्षा जास्त गुण मिळाले. तर कर्णधार म्हणून घरच्या मैदानावरील कामगिरी, एकदिवसीय क्रिकेटमधील कर्णधार म्हणून कामगिरी, विजेतेपद आणि कर्णधार असताना फलंदाज म्हणून कामगिरी या चार विभागांत गांगुलीपेक्षा धोनी सरस ठरला. धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ टी-२० आणि २०११ एकदिवसीय असे दोन विश्वचषक, तर २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली.

फलंदाज म्हणून कामगिरी दोघांतील मुख्य फरक

गांगुली आणि धोनी हे दोघेही उत्कृष्ट कर्णधार होते. मात्र, या दोघांमधील मुख्य फरक म्हणजे कर्णधार असताना धोनीने फलंदाज म्हणून केलेली कामगिरी. मधल्या फळीत खेळताना त्याने फिनिशरची भूमिका पार पाडली आणि भारताला अनेक सामने जिंकवून दिले. तो शांत आणि संयमी असल्याने इतर खेळाडूंचा आत्मविश्वास वाढायचा, असे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -