IND vs AUS : कोहली नसताना भारताचे खेळाडू खेळ उंचावतात – गावस्कर

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला झुंज देईल याची गावस्करांना खात्री आहे.

Virat Kohli
विराट कोहली

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली पितृत्व रजेवर जाणार असून पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे. कोहली सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत मोठ्या फरकाने पराभूत होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर या मताशी सहमत नाहीत. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला झुंज देईल याची त्यांना खात्री आहे.

भारतीय संघाची मागील काही वर्षांतील कामगिरी पाहिल्यास आपल्याला लक्षात येते की, विराट संघात नसताना भारताने जवळपास सर्वच सामने जिंकले आहेत. धर्मशाळा येथे झालेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी, अफगाणिस्तानविरुद्धची कसोटी, निदहास करंडक आणि २०१८ आशिया चषक ही याची उत्तम उदाहरणे आहेत.विराटच्या अनुपस्थितीत भारताचे इतर खेळाडू त्यांचा खेळ उंचावतात. विराट संघात नसल्याने त्यांना अधिक योगदान द्यावे लागणार याची त्यांना कल्पना असते, असे गावस्कर एका मुलाखतीत म्हणाले.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या तीन कसोटीत कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारताचे नेतृत्व करणे अपेक्षित आहे. कर्णधारपदाच्या जबाबदारीचा रहाणेला फायदा होईल असे गावस्कर यांना वाटते. भारताला जिंकण्यासाठी रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना मोठ्या धावा कराव्या लागणार आहेत. कर्णधारपदाच्या जबाबदारीचा रहाणेला फायदा होईल. विराटच्या अनुपस्थितीत कोण भारताचे नेतृत्व करणार हे निवड समितीला ठाऊक आहे आणि रहाणेने याआधी कसोटीत भारताचे यशस्वी नेतृत्व केले आहे, असे गावस्कर यांनी सांगितले.