Ind vs Aus : पहिल्याच सामन्यात टीम इंडिया पराभूत, ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय!

ind vs aus

कोरोनामुळे गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एकही सामना न खेळलेल्या टीम इंडियाचा त्यानंतर पहिल्याच सामन्यात धुव्वा उडाला आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेली टीम इंडिया दौऱ्याच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून तब्बल ६६ धावांनी पराभूत झाली आहे. दौऱ्याच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. पहिली बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाने ५० ओव्हर्समध्ये ६ विकेट्सच्या बदल्यात ३७४ धावा फटकावल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव ५० ओव्हर्समध्ये ८ विकेट्सच्या मोबदल्यात ३०८ धावांपर्यंतच पोहोचू शकला. शिखर धवन आणि हार्दिक पंड्या यांनी दिलेली झुंज अखेर अपयशीच ठरली.

टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर डेविड वॉर्नरसोबत खुद्द कर्णधारच सलामीला मैदानात उतरला. या दोघांनी तब्बल १५६ धावांची सलामी दिली. डेविड वॉर्नर ६९ धावांवर बाद झाल्यानंतर आलेल्या स्टीवन स्मिथनं तर भारतीय बॉलिंगवर अक्षरश: आक्रमणच केलं. १०८ धावांची भर घातल्यानंतर एरॉन फिंचला ११४ धावांवर बुमराहनं माघारी धाडलं. त्यानंतर अवध्या ७ धावांची भर घालून स्टीव्हन स्मिथ १०५ धावांवर बाद झाला. यानंतर ऑस्ट्रेलियाला नियंत्रणात ठेवता येईल, असं वाटत असतानाच आयपीएलमध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या ग्लेन मॅक्सवेलनंही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. शेवटच्या षटकांमध्ये मॅक्सवेलनं १९ बॉलमध्ये ४५ धावा फटकावत भारतीय बॉलिंगवर हल्ला चढवला.

विजयासाठी तब्बल ३७५ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला मयांक अगरवाल आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीने आश्वासक सुरुवात करून दिली. पण सहाव्या षटकात ५३ धावांवर मयांक अगरवाल बाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीनेही निराशा करत २१ धावा करून तंबूचा रस्ता धरला. पाठोपाठ अपेक्षांचं ओझं डोक्यावर असलेले श्रेयस अय्यर (२) आणि के. एल. राहुल (१२) स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर शिखर धवन आणि हार्दिक पंड्यानं डावाला आकार दिला. या दोघांची भागीदारी संघाला विजयाजवळ नेईल असं वाटत असतानाच वैयक्तिक ७४ धावांवर शिखर धवन बाद धाला. त्यापाठोपाठ फक्त २८ धावांची भर घालून हार्दिक पंड्या (९०) देखील बाद झाला. त्यानंतर आलेल्या कोणत्याही फलंदाजाला भारताचा डाव विजयापर्यंत नेता आला नाही. अखेर ८ गड्यांच्या मोबदल्यात भारताला ३०८ धावांपर्यंतच मजल मारता आली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पुढचा सामना २ डिसेंबर रोजी कॅनबेरा इथं भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी सुरू होईल. ऑस्ट्रेलियामध्ये हा सामना दिवस-रात्र असेल.