ICC WC 2023 अहमदाबाद: आयसीसी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा रोमांचक मेगा फायनल सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः अहमदाबादला पोहोचणार आहेत. त्यांच्यासोबत देशाचे गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणार आहेत. (IND Vs AUS Final PM Modi to be present for final Organizing special air shows)
एवढेच नाही तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि डेप्युटी पीएम रिचर्ड मार्लेस यांनाही या सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि उपपंतप्रधानही हा शानदार सामना पाहतील अशी अपेक्षा आहे. मात्र, दोघांकडूनही दुजोरा मिळण्याची प्रतीक्षा आहे. ऑस्ट्रेलिया 8व्यांदा अंतिम सामना खेळणार आहे. तर भारतीय संघाचा विश्वचषकातील हा चौथा विजेतेपदाचा सामना असेल.
याशिवाय भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, कपिल देव हेसुद्धा फायनल पाहण्यासाठी पोहोचू शकतात. फायनलमध्ये सामन्याआधी खास एअर शोचे आयोजन करण्यात आले आहे.
कडेकोट बंदोबस्तात पंतप्रधान मोदी येणार अहमदाबादला
सध्या पीएम मोदींचा गुजरात दौरा निश्चित होत आहे. चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. पंतप्रधान 19 नोव्हेंबरला दुपारनंतर अहमदाबादला पोहोचतील. सामना पाहिल्यानंतर पंतप्रधान गांधीनगर राजभवनात रात्री विश्रांती घेतील. येथून दुसऱ्याच दिवशी 20 नोव्हेंबरला सकाळी पंतप्रधान राजस्थानच्या निवडणूक दौऱ्यावर रवाना होतील.
न्यूझीलंडचा पराभव करून भारताने अंतिम फेरीत केला प्रवेश
दोनच दिवसांपूर्वी भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला होता. या सामन्यात भारताने पहिला डाव खेळताना 397 धावा केल्या होत्या. त्यानंतर या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आलेला न्यूझीलंडचा संघ 327 धावांत गारद झाला. भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीने या सामन्यात आपले कौशल्य दाखवले. त्याने न्यूझीलंडला 9.5 षटकात 57 धावा देत 7 बळी घेतले.
उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा केला पराभव
भारताने अंतिम फेरी गाठल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात उपांत्य फेरीचा सामना झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 213 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात कांगारू संघाने 47.2 षटकांत 7 गडी गमावून सामना जिंकला. मात्र, हा सामना जिंकण्यासाठी त्याला घाम गाळावा लागला, कारण आफ्रिकेने 174 धावांत 6 विकेट्स घेतल्या होत्या.
20 वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल
हा सामना देखील रोमांचक होणार आहे कारण भारत आणि ऑस्ट्रेलिया 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. याआधी 2003 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे हा जेतेपदाचा सामना खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाला 125 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यावेळी भारतीय संघाची कमान दादा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौरव गांगुलीच्या हातात होती. रिकी पाँटिंग कांगारू संघाचे नेतृत्व करत होता.
(हेही वाचा: ICC WC 2023: विश्वचषकाची अंतिम फेरी भारत-ऑस्ट्रेलिया; 2003 चा वचपा काढणार का? )