Ind vs Aus: अश्विन-विहारीची झुंजार फलंदाजी; तिसरी कसोटी अनिर्णीत

Ind vs Aus india australia third test drawn

भारताच्या हनुमा विहारी आणि फिरकीपटू रविचंद्रन आश्विनने तब्बल ४३ षटकं झुंजार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी कसोटी अनिर्णित राखण्याचा पराक्रम गाजवला आहे. सिडनीतील तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताला ४०७ धावांचं बलाढ्य लक्ष्य दिलं होतं. रिषभ पंत आणि चेतेश्व पुजाराने रचलेल्या १४८ धावांच्या भागिदारीने भारताला कसोटी जिंकण्याची संधी होती. मात्र, पुजारा आणि पंत माघारी परतल्याने भारताला तिसरी कसोटी अनिर्णीत राखण्यासाठी संघर्ष करावा लागला. अश्विन आणि विहारीने ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीचा नेटाने सामना करत कसोटी अनिर्णीत राखली.

विहारी-अश्विन दोघेही दुखापतग्रस्त असताना संयमी फलंदाजी करत सामना वाचवला. विहारी-अश्विन यांनी सहाव्या गड्यासाठी २५९ चेंडूत ६२ धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघानं पाच गड्यांच्या मोबदल्यात ३३४ धावापर्यंत मजल मारली. पाचव्या दिवशी फलंदाजी करताना विहारीनं १६१ चेंडूंचा सामना केला. तर अश्विननं विहारीला संयमी साथ देत १२८ चेंडूचा सामना केला. भारताचा पराभव होणार असं वाटत असताना या जोडीनं संयमी आणि चिवट फलंदाजी करत पराभव टाळला. ऑस्ट्रेलियानं विहारी-अश्विन यांची जोडी फोडण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न केले. मात्र, अश्विन-विहारी यांनी आपला संयम ढासळू न देता भारताचा पराभव टाळला.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात स्टिव्ह स्मिथच्या शतकाच्या जोरावर ३३८ धावा केल्या. स्मिथने २२६ चेंडूंचा सामना करत १३१ धावा केल्या. त्याला लाबूशानेने (९१) चांगली साथ दिली. भारताकडून पहिल्या डावात रविंद्र जाडेजाने भेदक गोलंदाजी करत ४ गडी बाद केले. तर बुमरा आणि सैनीने प्रत्येकी २-२ बळी घेतले. त्यानंतर भारताचा पहिला डाव २४४ धावांवर आटोपला. भारताच्या डावाला चांगली सुरुवात झाली होती. मात्र, हेजलवूडने सलामीवीर रोहित शर्माला माघारी धाडत भारताला पहिला धक्का दिला. रोहितने २६ धावा केल्या. त्यानंतर सलामीवीर शुबमन गील आणि् चेतेश्वर पुजाराने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी अर्धशतक झळकावत पॅव्हेलिअनची वाट धरली. त्यानंतर कर्णधार रहाणे देखील २२ धावा करुन बाद झाला. त्यानंतर ठरावीक अंताराने भारतीय फलंदाज बाद झाले. ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीच्या समोर भारताचा पहिला डाव २४४ धावांवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ९४ धावांची आघीडी मिळाली. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ३१२ धावांवर घोषित करत भारताला ४०७ धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर रोहित शर्माने अर्धशतक झळकावलं. भारताला चौथ्या दिवशी दोन धक्के बसले. भारताचे दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गील दोघेही चौथा दिवस संपण्याआधी तंबुत परतले.

भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने पुजाराच्या साथीने पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरूवात केली. पहिल्या सत्रात रहाणे लगेचच बाद झाला. पण त्यानंतर ऋषभ पंतने सामन्याची सूत्र हाती घेतली. त्याने सुरूवातीला सावध खेळ केला, त्यानंतर मात्र त्याने फटकेबाजी केली. त्याचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. पंतने १२ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी करत ११८ चेंडूमध्ये ९७ धावा कुटल्या. नॅथन लायनने त्याला बाद केलं. त्यानंतर काही वेळाने अत्यंत संयमी खेळी करणारा पुजारादेखील त्रिफळाचीत झाला. त्याने २०५ चेंडूत ७७ धावा केल्या.