घरक्रीडाIND vs AUS : विराटसेनेला गरज बदलांची !

IND vs AUS : विराटसेनेला गरज बदलांची !

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-२० सामना आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे होणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-२० सामना आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना गमावल्यामुळे भारताला आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे त्यांना अनिवार्य आहे. त्यासाठी भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे.

चहलचे होणार पुनरागमन ? 

ब्रिस्बन येथे झालेल्या पहिला टी-२० सामना ऑस्ट्रेलियाने डकवर्थ-लुईस नियमानुसार ४ धावांनी जिंकला. त्यामुळे त्यांनी ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी चांगली गोलंदाजी केली. पण पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या कृणाल पांड्या आणि खलील अहमद यांना चांगली कामगिरी करता आली नाही. पांड्याने ४ षटकांत ५५ तर खलीलने ३ षटकांत ४२ धावा दिल्या. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात लेगस्पिनर युझवेन्द्र चहलचे भारतीय संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. मेलबर्नचे मैदान हे बाकी मैदानांच्या तुलनेत मोठे असल्याने त्याचा फायदा फिरकी गोलंदाजांना होऊ शकतो. पण पांड्याला वगळले तर भारतीय संघात एक फलंदाज कमी होईल. त्यामुळे या सामन्यात खलीलच्या जागी चहलला संधी मिळण्याची शक्यता आहे.

राहुलच्या कामगिरीत सातत्याचा आभाव 

तर फलंदाजांमध्ये लोकेश राहुलला मागील काही काळात सातत्यपूर्ण प्रदर्शन करता आलेले नाही. मागील ६ टी-२० सामन्यांत त्याने ३० धावांचा टप्पा एकदाही पार केलेला नाही. तसेच राहुल संघात असताना विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करता येत नाही. त्यामुळे त्याच्या जागी मुंबईकर श्रेयस अय्यर किंवा मनीष पांडेला संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच भारताला आपले क्षेत्ररक्षणही सुधारणे गरजेचे आहे. पहिल्या टी-२० सामन्यात भारताने अनेक झेल सोडले, धावबाद करण्याच्या संधी सोडल्या. त्याची किंमत भारताला मोजावी लागली.

मालिका बरोबरीत करणे हे लक्ष्य 

मात्र, इतक्या चुका झाल्या असल्या तरी भारताने पहिला टी-२० सामना अवघ्या ४ धावांनीच गमावला. त्यामुळे जर भारताने आपला खेळ योग्यवेळी उंचावला तर ते हा दुसरा सामना जिंकून या मालिकेत बरोबरी करू शकतील.
दुसरा टी-२० सामना
वेळ – दुपारी १:२० पासून 
थेट प्रक्षेपण – सोनी सिक्स, सोनी टेन ३
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -