घरक्रीडाInd vs Aus : दुसरी टी-२० देखील भारतानं घातली खिशात! ऑस्ट्रेलियाला झटका!

Ind vs Aus : दुसरी टी-२० देखील भारतानं घातली खिशात! ऑस्ट्रेलियाला झटका!

Subscribe

कनकशनच्या नियमांच्या आधारे रविंद्र जाडेजाच्या जागेवर मैदानात उतरून चहलनं घेतलेल्या विकेट्सच्या आधारावर टीम इंडियानं पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. आता दुसऱ्या टी-२०मध्ये मात्र तब्बल १९५ धावांचा डोंगर विजयासाठी आवश्यक असताना देखील आपल्या भक्कम फलंदाजीच्या जोरावर भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आहे. हार्दिक पंड्यानं शेवटच्या षटकांमध्ये केलेल्या दणदणीत फटकेबाजीच्या जोरावर भारतानं ऑस्ट्रेलियाला तब्बल ६ विकेट्सने हरवत टी-२० मालिका देखील खिशात घातली आहे. विजयासाठीचं १९५ धावांचं आव्हान भारतानं ४ विकेट्सच्या मोबदल्यात १९.४ षटकांत पूर्ण केलं. कर्णधार विराट कोहलीला सापडलेला सूर ही भारतासाठी या सामन्यातली महत्वाची बाब ठरली आहे.

टॉस जिंकून पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेणाऱ्या टीम इंडियासाठी सुरुवात खराब झाली. स्मिथच्या एरॉन फिंचच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या मॅथ्यु वेडनं सुरुवातीपासूनच फटकेबाजी करायला सुरुवात केली. मात्र, त्याच्यासोबत आलेल्या शॉर्टला जम बसवता आला नाही. नटराजननं श्रेयस अय्यरकरवी त्याला वैयक्तिक ९ धावांवर असताना पाचव्या षटकात बाद केलं. त्यानंतर आलेल्या स्मिथनं वेडसोबत भागीदारी करायला सुरुवात केली. पण चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात वेड ५८ धावांवर बाद झाला. पहिल्या सामन्याचा सामनावीर ठरलेल्या चहलनं स्मिथलाही ४६ धावांवर माघारी धाडलं. त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेल आणि हेन्रिकसनं देखील भारतीय बॉलर्सवर तुफान हल्ला चढवला. २० ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियानं ५ गड्यांच्या मोबदल्यात १९४ धावांचा पाऊस पाडला.

- Advertisement -

विजयासाठी १९५ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाच्या सलामीवीरांनी आश्वासक सुरुवात केली. के. एल. राहुल (३०) आणि शिखर धवन (५२) या दोघांनी भारताला ५६ धावांची सलामी दिली. मात्र सहाव्या षटकात टायनं के. एल. राहुलला माघारी धाडल्यानंतर ही भागीदारी तुटली. त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीसह (४०) शिखर धवननं भारताच्या डावाला आकार दिला. १२व्या ओव्हरमध्ये झॅम्पाच्या बॉलिंगवर स्वेपसननं धवनचा झेल टिपला. त्यानंतर आलेल्या संजू सॅमसनला (१५) देखील फारशी चमक दाखवता आली नाही. १७व्या षटकात भारताला विजयासाठी ४६ धावांची आवश्यकता असताना कर्णधार विराट कोहली देखील बाद झाला. त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा मावळत असतानाच हार्दिक पंड्यानं सूत्र हाती घेतली.

शेवटच्या षटकांमध्ये हार्दिक पंड्यानं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर तुफान हल्ला चढवला. त्यानं अवघ्या २२ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ४२ धावा कुटल्या आणि शेवटच्या षटकापर्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारताला विजय मिळवून दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -