नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या पहिला कसोटी सामना पर्थमध्ये सुरू आहे. बोर्डर – गावस्कर ट्रॉफीसाठी सुरू असलेल्या मालिकेमधील पहिल्या सामन्याचा पहिला दिवस हा गोलंदाजाच्या नावावर राहिला. यावेळी भारतीय संघाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण ऑस्ट्रेलियाच्या गोलादाजांसमोर नितीशकुमार रेड्डी आणि रिषभ पंत वगळता कोणत्याही गोलंदाजाला टिकाव धरता आला नाही. संपूर्ण संघ 150वर सर्व बाद झाला. त्यानंतर दिवसाखेर ऑस्ट्रेलियाची अवस्था 7 विकेट्सवर 67 धावा अशी होती. (IND vs AUS Test 17 wickets for bowlers on first day)
हेही वाचा : Aus vs Ind Test : सगळं ठीक असेल तर…; शमीबद्दल काय म्हणाला कर्णधार बुमराह?
भारतीय संघाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर एकाही फलंदाजाला टिकाव धरता आला नाही. 60 धावांच्या आता भारताचा निम्मा संघ हा माघारी परतला होता. यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पड्डीकल हे शून्यावर बाद झाले तर, के एल राहुल हा 26 धावा, विराट कोहली हा 5 धावांवर माघारी परतले. यावेळी के एल राहुलने 74 चेंडूंमध्ये 26 धावा केल्या. त्यानंतर रिषभ पंतनेदेखील आपल्या अनुभवाच्या जोरावर 37 धावा केल्या. दरम्यान, पदार्पणातच नितीशकुमार रेड्डीने सर्वाधिक 41 धावा करत आपली वेगळी छाप पाडली. पण यावेळी इतर कोणत्याही फलंदाजाला दुसरी बाजू संभाळता आली नाही. यावेळी जोश हेझलवुडने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
150 धावांचा पाठलाग करण्यास उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचीही सुरुवात चागंली आली नाही. नॅथन मॅकस्विनी (10 धावा), उस्मान ख्वाजा (8 धावा) , स्टीव्हन स्मिथ (0 धाव) यांची विकेट घेत कर्णधार जसप्रीत बुमराहने भारताला चांगलीच सुरुवात करून दिली. त्यानंतर दिवस संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ हा 7 बाद 67 धावाच करू शकला होता. यावेळी ॲलेक्स कॅरी हा 19 धावा तर मिचेल स्टार्क हा 6 धावांवर नाबाद होते. यावेळी कर्णधार बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या आहेत. तर, मोहोम्मद सिराजने 2 विकेट्स आणि हर्षित राणाने 1 विकेट घेतली आहे. त्यामुळे आता पुढील काही दिवसांमध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधार जसप्रीत बूमराहवर हा सामना जिंकण्याचा मोठा दबाव असणार आहे.
Edited by Abhijeet Jadhav