नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पाचव्या तसेच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेतील अखेरच्या कसोटीसाठी भारतीय संघात काही मोठे बदल करण्यात आले. रोहित शर्मा कर्णधार असूनही त्याला पाचव्या कसोटीसाठी संघाबाहेर ठेवण्यात आले. मात्र, तरीही भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीत चांगली कामगिरी करता आलेली नाही. पहिल्याच दिवशी भारतीय संघ हा 185 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे आता अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. (IND vs AUS Test Team India all out on 185 after rohit sharma being dropped)
सिडनी कसोटीआधी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला. यावेळी स्वतः कर्णधार रोहित शर्मा हा संघाबाहेर राहिला आणि जसप्रीत बूमराहकडे संघाचे नेतृत्व सोपवले होते. यावेळी तरी संघ चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा भारतीय संघाकडून करण्यात येत होती. मात्र, यामध्ये संघ सपशेल अपयशी ठरला. भारतीय फलंदाजांनी 72.2 षटके फलंदाजी करत सर्व विकेट्स गमावत 185 धावा केल्या. भारताकडून यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने सर्वाधिक 40 धावा यावेळी केल्या. तसेच, ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने शानदार गोलंदाजी करत 4 विकेट्स घेतले.
नाणेफेक जिंकत प्रथम कर्णधार जसप्रीत बूमराहने फलंदाजीचा निर्णय घेतला. असे असतानाही भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. केएल राहुलनंतर (4 धावा) यशस्वी जैस्वाल (10 धावा) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर शुभमन गिलही उपाहारापूर्वी शेवटच्या चेंडूवर 20 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीदेखील अवघ्या 17 धावांवर बाद झाला. 72 धावांवर 4 बाद अशी अवस्था असताना ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा या दोघांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पंतने 98 चेंडूत 40 धावा केल्या तर जडेजाने 95 चेंडूत 26 धावा केल्या. पण दोघेही फार काळ खेळपट्टीवर टिकले नाहीत.
त्यानंतर स्वतः कर्णधार आणि भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुढाकार घेत 17 चेंडूत 22 धावांची तडाखेबाज केली. तर, वॉशिंग्टन सुंदरनेही 14 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने 4, तर मिचेल स्टार्कने 3 विकेट्स घेतले. तर, पॅट कमिन्सला 2 आणि नॅथन लायनला एक विकेट मिळाली. षटकांचा वेग अतिशय संथ असल्याने पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाला फलंदाजीला यावे लागले. त्यामुळे तीन सत्रात फक्त 72 षटके खेळली गेली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ 9 धावांवर एक बाद अशी स्थिती आहे.