नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या सिडनी कसोटीत भारतीय संघाने पकड बनवली आहे, असे वाटत असताना पुन्हा एकदा फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. एकीकडे अनेक फलंदाज लागोपाठ बाद होत असताना भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने आपल्या शैलीत फलंदाजी केली आणि फक्त 29 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाची अवस्था 6 बाद 141 अशी होती. गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत 181 वर सर्वबाद केला. पण यानंतर भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा मोठी निराशा केली. (IND vs AUS Test Team India Batting shattered in Second Innings)
हेही वाचा : IND vs AUS Test : संघात बदल तरीही अपयशी; सिडनी कसोटीत 185 वर सर्वबाद
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 9 बाद 1 यापासून सुरुवात केली होती. यावेळी भारतीय संघाने केलेल्या 185 धावांचा पाठलाग करताना त्यांची दमछाक झाली. भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ हा 181 वर सर्वबाद केला. यावेळी आस्ट्रेलियाचा फलंदाज ब्यू वेबस्टरने सर्वाधिक 57 धावा केल्या. तर, सॅम कॉन्स्टासने 23 आणि स्टीव्ह स्मिथने 33 धावा केल्या. त्यांच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. याचवेळी मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर, नितीश कुमार रेड्डी आणि कर्णधार जसप्रीत बूमरहाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर भारतीय संघाला 4 धावांची आघाडी असताना भारतीय फलंदाजांकडे आपले वर्चस्व कायम ठेवण्याची उत्तम संधी होती. मात्र, यामध्ये पुन्हा एकदा सर्व आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. सलामीवीर यशस्वी जैस्वालने संघाला दमदार सुरुवात करून दिली. एकाच षटकात त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला चार चौकार मारले. पण, के. राहुलसोबत त्याने 42 धावांची भागीदारी केली आणि त्यानंतर राहुल बाद झाला. के. एल. राहुलने 13 चेंडूत 20 धावा केल्या. तर, यशस्वीने 35 चेंडूत 22 धावा केल्या.
सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतर शुबमन गिल आणि विराट कोहली यांच्याकडून संयमी खेळीची अपेक्षा होती. पण शुबमन गिल 13 धावांवर तर विराट कोहली 6 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने आपल्या शैलीत फलंदाजी करत फक्त 29 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. तसेच, फक्त 33 चेंडूत 61 धावा करत तो बाद झाला. दुसरा दिवस संपला तेव्हा रवींद्र जडेजा हा 8 तर वॉशिंग्टन सुंदर हा 6 धावांवर नाबाद होता. तसेच, भारतीय संघाने 6 विकेट्स गमावत 141 धावा केल्या असून 145 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता तिसऱ्या दिवशी काय होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.