नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने चांगली कामगिरी करत धावांचा डोंगर ऑस्ट्रेलियासमोर उभारला. पहिल्या डावात सपशेल अपयशी ठरलेल्या भारतीय संघाने दुसर्या डावामध्ये 6 विकेट्स गमावत 487 धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 534 धावांची गरज असून त्यांच्याकडे आणखी दोन दिवसांचा कालावधी आहे. यावेळी, जैस्वाल याची दीड शतकी खेळी तर विराट कोहलीच्या शतकाची चांगलीच चर्चा झाली. 534 धावांचा डोंगर पार करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली आहे. दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने 3 बाद 12 अशी कामगिरी केली. (IND vs AUS Test team india gave 534 runs target in second inning)
हेही वाचा : IND vs AUS Test : यशस्वी जैस्वालची कामगिरी अन् केले हे विक्रम; वाचा सविस्तर
महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव 150 धनावर आटोपला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघदेखील पहिल्या डावात 104 धावा केल्या. दुसर्या डावाची सुरुवात केली तेव्हा भारताकडे 46 धावांची आघाडी होती. सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वाल आणि के. एल. राहुल यांनी धडाकेबाज सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 201 धावांची भागीदारी करत इतिहास रचला. यावेळी यशस्वी जैस्वालने 161 तर राहुलने 77 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या देवदत्त पड्डीकलनेदेखील 25 धावा केल्या. यावेळी विराट कोहली हा शेवटपर्यंत खेळत राहिला आणि आपल्या कारकिर्दीतील 80 वे आणि कसोटीतील 30वे शतक झळकावले आणि शतकांचा दुष्काळ संपवला. त्याने याआधी 491 दिवसांआधी कसोटीत शतक झळकावले होते.
6 विकेट्सवर 487 धावावर भारताने डाव घोषित केला. यावेळी 534 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची चांगलीच दैना उडाली. कारण, अवघ्या 12 धावांवर 3 विकेट्स ऑस्ट्रेलियाने गमावल्या आहेत. कर्णधार जसप्रीत बूमराहने 2 तर मोहम्मद सिराजने एक विकेट घेत संघाला चांगली सुरुवात करून दिली. तिसरा दिवस संपला तेव्हा उस्मान ख्वाजा हा 3 धावांवर नाबाद होता. दरम्यान, ऑस्ट्रेलिया हा सामना जिकण्यासाठी 2 दिवसात 522 धावांची गरज आहे. तर, भारतीय संघाला विजयासाठी 7 विकेट्सची गरज आहे. WTC 2023 – 25 मध्ये भारतीय संघाला अंतिम सामन्यासाठी आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरोधात चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.