घरक्रीडाIND vs AUS third test : टीम इंडियाला गरज धावांची; तिसरा कसोटी...

IND vs AUS third test : टीम इंडियाला गरज धावांची; तिसरा कसोटी सामना आजपासून

Subscribe

या कसोटी सामन्यासाठी सलामीवीर लोकेश राहुल आणि मुरली विजय यांना संघातून वगळण्यात आले आहे. तर मयांक अगरवाल पदार्पण करणार आहे.

ऐतिहासिक मेलबर्न स्टेडियमवर होणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. चार सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना भारताने ३१ धावांनी जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत हा सामना १४६ धावांनी जिंकला. त्यामुळे २ सामन्यांनंतर या मालिकेत १-१ अशी बरोबरी आहे. भारताच्या गोलंदाजांनी या मालिकेत चांगले प्रदर्शन केले आहे. मात्र, फलंदाजांनी त्यांना चांगली साथ दिलेली नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला फलंदाजांकडून मोठ्या खेळीची गरज आहे आणि त्यासाठी भारताने संघात काही बदलही केले आहेत.

मयांक अगरवाल-हनुमा विहारी डावाची सुरुवात करणार  

या मालिकेच्या पहिल्या दोन्ही सामन्यांत भारताचे सलामीवीर लोकेश राहुल आणि मुरली विजय यांनी चांगले प्रदर्शन करता आले नाही. राहुलने २ सामन्यांच्या ४ डावांत १२ च्या सरासरीने अवघ्या ४८ धावा तर विजयने ४ डावांत १२.२५ च्या सरासरीने ४९ धावा केल्या होत्या. त्यामुळे तिसऱ्या कसोटीसाठी या दोघांनाही संघातून वगळण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी मयांक अगरवाल आणि हनुमा विहारी भारताच्या डावाची सुरुवात करणार आहेत. अगरवाल या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. तर फक्त २ कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या विहारीची कसोटी क्रिकेटमध्ये सलामी करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. त्यामुळे या दोघांवर सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन गोलंदाज दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील हे निश्चित. तसेच दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्याला मुकलेल्या रोहित शर्माचे संघात पुनरागमन झाले आहे.

जाडेजाला संघात स्थान 

पर्थमध्ये चार वेगवान गोलंदाजांना खेळवण्याचा प्रयोग फसल्यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताने डावखुरा अष्टपैलू रविंद्र जाडेजाला संघात स्थान दिले आहे. त्याच्या समावेशामुळे गोलंदाजीबरोबरच भारताची फलंदाजीही मजबूत होणार आहे. ऑस्ट्रेलियानेही तिसऱ्या कसोटीसाठी संघात एक बदल केला आहे. त्यांनी फलंदाज पीटर हॅंड्सकोम्बला वगळून अष्टपैलू आणि उपकर्णधार मिचेल मार्शला संघात स्थान दिले आहे.

खेळपट्टीवर साऱ्यांचे लक्ष

हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. या मैदानावरील खेळपट्टी ही मागील काही काळापासून चर्चेचा विषय ठरली आहे. या मैदानावर मागील वर्षी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेचा सामना अनिर्णित राहिला होता. या सामन्यातील खेळपट्टीला आयसीसीने ‘खराब’ असा शिक्का दिला होता. त्यामुळे या सामन्यातील खेळपट्टी कशी असणार याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

तिसऱ्या कसोटीसाठी संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया : टीम पेन (कर्णधार,यष्टीरक्षक), मार्कस हॅरिस, अॅरॉन फिंच, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नेथन लायन, जॉश हेझलवूड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -