मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) : मेलबर्न येथे भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना सुरू आहे. या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी किंग कोहली आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू सॅम कॉन्स्टन्स यांच्यामध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले आणि महत्त्वाची बाब म्हणजे हा वाद वाढू नये याकरिता पंचानाही मध्यस्थी करावी लागली. परंतु, या राड्यामध्ये विराट कोहली याचीच चुकी असल्याची माहिती समोर आली असून यामुळे त्याला मोठा फटका सुद्धा बसला आहे. खेळांशी संबंधित बातम्या देणाऱ्या एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहलीला त्याच्या मॅच फीच्या 20% दंड ठोठावण्यात आला आहे. (IND vs AUS Virat Kohli fined for altercation with Sam Constas)
मेलबर्नमध्ये भारत वि. ऑस्ट्रेलिया हा चौथा कसोटी सामना सुरू असून या सामन्यात विराट कोहली हा ऑस्ट्रेलियाच्या नव्या खेळाडूला भिडला. सॅम कॉन्स्टास असे ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षीय खेळाडूचे नाव आहे. ज्यानंतर सर्वत्र याबाबतची चर्चा करण्यात आली. तर, या वादात सर्वात पहिली चूक विराट कोहली यानेच केली असल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने सांगितले आहे. पॉन्टिंगने चॅनल 7 या वाहिनीवर मुलाखत देत म्हटले की, विराट खेळपट्टीवर ज्याप्रमाणे चालत होता, यावरून त्याचा हेतू दिसून येतो. मला खात्री आहे की ही त्याची चूक आहे. आता काय झाले ते पंच आणि रेफ्रींनी देखील पाहिले असेल. त्यानंतर आता या प्रकरणावरून विराट कोहलीला त्याच्या मॅच फीच्या 20% दंड ठोठावण्यात आला आहे आणि MCG येथे बॉक्सिंग डे टेस्टमध्ये एक डिमेरिट पॉइंट मिळाला आहे.
हेही वाचा… IND vs AUS : विराट कोहलीचा पारा चढला, ऑस्ट्रेलियाच्या नव्या खेळाडूला जाऊन भिडला
नेमके काय घडले?
मेलबर्न येथे सुरू असलेल्या भारत वि. ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या कसोटी सामन्यावेळी 11 व्या षटकामध्ये जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. यावेळी बुमराहच्यासमोर ऑस्ट्रेलियाचा नवोदित खेळाडू सॅम कॉन्स्टन्स होता. सॅमने सुरुवातीला मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर मोठे शॉट मारत भारताला घाम फोडला. त्यानंतर सॅम कॉन्स्टन्स इतक्यावरच नाही थांबला तर त्याने बुमराहच्या गोलंदाजीवरही मोठे शॉट मारले. ज्यानंतर एका क्षणाला विराट कोहली बॉल उचलून सॅम कॉन्स्टन्सच्या दिशेने चालत आला. पण यावेळी सॅम कॉन्स्टन्स आणि कोहली या दोघांमध्येही धडक झाली आणि या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली.