England vs India 2nd Test : तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडला २५० धावांची आघाडी

भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना सध्या लॉर्ड्सवर सुरू आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने सामन्यावर मजबूत पकड मिळवत सामना इंग्लंडच्या बाजूने फिरवला. इंग्लंडकडे अद्याप ४ फलंदाज शिल्लक आहेत. इंग्लंडकडे सध्या २५० धावांची आघाडी आहे.

Chris Woakes
ख्रिस वोक्स

इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर सध्या भारत आणि इंग्लंडमध्ये दुसरी कसोटी सुरू आहे. काल सामन्याचा तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने सामन्यावर चांगली पकड मिळवली. तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने २५० धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात भारताची फलंदाजी ढेपाळली. भारताचा पहिला डाव १०७ धावांत आटोपला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी गड चांगलाच लढवला. तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने ७ बाद ३५७ धावा केल्या. दरम्यान, या सामन्यात इंग्लंडचे फलंदाज बेअरस्टॉ आणि वोक्सने मजबूत भागीदारी करत इंग्लंडच्या संघाला मोठी धावसंख्या उभारुन दिली. कमी प्रकाशामुळे सामना काही वेळ लवकर थांबवण्यात आला. सामना थांबवण्यात आला त्यावेळी ख्रिस वोक्स १२० धावांवर तर सॅम कुर्रान २२ धावांवर नाबाद होते. आज भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी साडे तीन वाजता चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होईल.

दिवसाची सुरूवात भारताची, शेवट इंग्लंडचा

ऑल राऊंडर ख्रिस व्होक्सच्या दमदार शतकाच्या जोरावर इंग्लंडने सामना आपल्या बाजूने फिरवला. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाची भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. सलामीवीर के. के. जेनिंग्ज याला मोहम्मद शमी याने सातव्या षटकांतच पायचीत केले. त्यानंतर पुढच्या षटकात इशांत शर्माने कुकला तंबूत धाडले. दोन्ही सलामीवीर ३२ धावांतच माघारी परतल्यावर कर्णधार जो रुट याने ओली पोपच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र पोपला पांड्याने पायचीत केले. त्यानंतर मोहम्मद शमीने जो रुट (१९) आणि जोश बटलरला (२४) पायचीत करत सामन्यावर चांगलीच पकड मिळवली. परंतु उपहारानंतर भारताचे निर्माण झालेले वर्चस्व मोडून काढत इंग्लंडच्या बेअरस्टॉ आणि ख्रिस व्होक्स यांनी डाव सावरला. या दोघांनी १८९ धावांची भागीदारी केली. बेअरस्टोने १४४ चेंडूत ९३ धावा केला तर व्होक्स १५९ चेंडूंत १२० धावांवर नाबाद आहे. चहापानानंतर हार्दिक पांड्याने बेअरस्टॉला बाद करत जमलेली जोडी फोडली.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव सर्वबाद १०७
इंग्लंड ३५७/७ (८१ षटके)

अ‍ॅलिस्टर कूक झे. कार्तिक, गो. शर्मा २१
के.के. जेनिंग्ज पायचीत, गो. मोहम्मद शमी ११
जो रुट पायचीत, गो. मोहम्मद शमी १९
ओली पोप पायचीत, गो. पांड्या २८
जॉनी बेअरस्टॉ ९३, झे. कार्तिक, गो. पांड्या
जोश बटलर पायचीत, गो. मोहम्मद शमी २४
ख्रिस व्होक्स नाबाद १२० 
सॅम क्युरान नाबाद २२
अवांतर १९

भारतीय गोलंदाजी :

इशांत शर्मा १९-३-८८-१
मोहम्मद शमी १९-४-७४-३
कुलदीप यादव ९-१-४४-०
हार्दिक पांड्या १७-०-६६-२
अश्विन १७-१-६८-०